राजस्थानमध्ये Ebola चा पहिला संशयित रुग्ण! जयपूरला आलेल्या परदेशी महिलेला आयसोलेशनमध्ये ठेवले, आरोग्य विभाग सतर्क

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आफ्रिकेतील काँगो आणि युगांडा या देशांमध्ये इबोला व्हायरसचा शिरकाव झाल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) आणीबाणी घोषित केली आहे. अशातच राजस्थानमध्ये इबोला व्हायरसचा पहिला संशयित रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. जयपूर येथे पर्यटनासाठी युगांडातून आलेल्या एका परदेशी महिलेमध्ये इबोला व्हायरससारखी लक्षणे दिसून आली आहेत. त्यामुळे त्या महिलेला तातडीने जयपूरमधील आरयूएचएस (RUHS) रुग्णालयात दाखल करून आयसोलेशन वार्डमध्ये ठेवण्यात आले आहे. या महिलेचा तपासणी अहवाल येईपर्यंत आरोग्य विभाग आणि रुग्णालय प्रशासन पूर्णपणे हाय अलर्ट मोडवर आहे. कोरोना सारख्या महामारीनंतर आता हा इबोला व्हायरस झपाट्याने पसरत असल्यामुळे नागरिकांमध्ये चिंता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला आज शुक्रवारी पहाटे सुमारे साडेचार वाजता एअर अरेबियाच्या विमानाने शारजाहमार्गे जयपूर विमानतळावर पोहोचली होती. जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांची नियमित आरोग्य तपासणी सुरू असताना या महिलेच्या तपासणीत इबोला संसर्गाची लक्षणे आढळल्याची शंका उपस्थित झाली. त्यामुळे तात्काळ त्या महिलेला विमानतळावरूनच विशेष रुग्णवाहिकेने थेट आरयूएचएस रुग्णालयात रवाना केले.

रुग्णालय प्रशासनाने या महिलेला विशेष वैद्यकीय देखरेखीखाली आयसोलेशन वार्डात ठेवले आहे. आरयूएचएस रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अनिल गुप्ता यांनी सांगितले की, अद्याप या महिलेला इबोला संसर्ग झाल्याची अधिकृत पुष्टी झालेली नाही. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून महिलेच्या रक्ताचे नमुने पुढील तपासणीसाठी पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे (NIV Pune) पाठवण्यात आले आहेत. प्रयोगशाळेचा अंतिम अहवाल आल्यानंतरच या संसर्गाबाबतचे चित्र स्पष्ट होईल. आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयातील संपूर्ण वैद्यकीय पथकाला पीपीई किट्स आणि आवश्यक सुरक्षा मानकांसह विशेष सतर्कता बाळगण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

दरम्यान, या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरू नये म्हणून आरोग्य विभागाने जनतेला कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. सोशल मीडिया किंवा इतर अनधिकृत माध्यमांतून पसरणाऱ्या खोट्या बातम्यांवर विसंबून न राहता, नागरिकांनी केवळ प्रशासनाने जारी केलेल्या अधिकृत माहिती आणि सूचनांवरच विश्वास ठेवावा, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.