ड्रग्जमाफियाचा भर पोलीस ठाण्यात शिवसेना पदाधिकाऱ्यावर हल्ला, नशामुक्त नवी मुंबई अभियानाचा तुर्भे एमआयडीसीत बँड वाजला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
crime news new

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख महेश कोटीवाले यांच्यावर ड्रग्जमाफिया महिलांनी भर पोलीस ठाण्यात हल्ला केल्याचा प्रकार आज घडला. कोटीवाले हे काही कामानिमित्ताने तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गेले होते. ते पोलीस ठाण्यातून बाहेर पडत असताना या ड्रग्जमाफियांनी त्यांच्यावर हल्ला केला. दरम्यान नशामुक्त नवी मुंबई या अभियानांतर्गत नवी मुंबई पोलिसांनी दिघ्यापासून पनवेलपर्यंत कारवाईचा सपाटा लावला असला तरी तुर्भे एमआयडीसीत या अभियानाचा बँड वाजला आहे. या दोन्ही महिलांकडून गांजा आणि एमडी पावडरची विक्री केली जात आहे.

तुर्भे स्टोअर्स परिसरातील इंदिरा नगरमध्ये सीमा माने आणि सरिता सरवदे या दोन्ही ड्रग्जमाफिया महिलांनी धुमाकूळ घातला आहे. त्यांच्या विरोधात तक्रार केली म्हणून गणेश माने या तडीपार गुंडाने शिवसेनेचे उपशाखाप्रमुख आकाश शिंदे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्यातो गंभीर जखमी झालेले शिंदे हे महिनाभर महापालिका रुग्णालयात उपचार घेत होते. ते रुग्णालयातून घरी आल्यानंतर या दोन्ही महिलांनी आज महेश कोटीवाले यांच्यावर तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या आवारात हल्ला केला. आकाश शिंदे हे महेश यांच्या सांगण्यावरून तक्रार करत असल्याचा कांगावा या महिलांनी केला आहे. या दोन्ही महिलांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या विरोधात अनेक गंभीर गुन्हे दाखल असले तरी त्यांच्यावर पोलीस कडक कारवाई करत नाहीत, असा आरोप महेश कोटीवाले यांनी केला आहे.

आरोपींवर कडक कारवाई करा

ड्रग्जमाफियांकडून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर थेट पोलीस ठाण्याच्या आवारात हल्ला होणे ही बाब शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणारी आहे. ड्रग्जमाफियांवर कुणाचाही वचक राहिलेला नाही हे यातून उघड होत आहे. त्यामुळे तुर्भे एमआयडीसीमध्ये गांजा आणि एमडी पावडरचा पुरवठा करणाऱ्या या ड्रग्जमाफिया महिलांवर आणि त्यांच्या पाठीराख्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील आणि प्रवीण म्हात्रे यांनी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांची भेट घेऊन केली. याप्रसंगी जिल्हा संघटक रंजना शिंत्रे, विधानसभाप्रमुख अतुल कुळकर्णी, उपजिल्हाप्रमुख संतोष घोसाळकर, समीर बागवान, रोहिणी भोईर, नंदा काटे, सिद्धाराम शिलवंत आदी उपस्थित होते.