
पेट्रोल-डिझेल, घरगुती गॅस यांसह जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीमुळे महागाई भडकली असून जनसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. महागाई आटोक्यात येत नसल्याने आज महाविकास आघाडीच्या वतीने उरणमध्ये जनआक्रोश मोर्चा काढला. बैलगाडीतून पदाधिकारी, कार्यकर्ते तहसील कार्यालयावर धडकले. यावेळेला सरकारविरोधी घोषणांनी उरण दणाणून गेले. मोर्चामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली.
पेट्रोल-डिझेल, घरगुती गॅस, जीवनावश्यक वस्तू, सोने-चांदी व दूध दरवाढीमुळे सामान्यांचा श्वास कोंडला आहे. जनता न्यायासाठी सरकारकडे पाहत आहेत. पण सरकार सुस्त आहे. याचा सरकारला जाब विचारण्यासाठी आज उरणमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने जनआक्रोश मोर्चा काढला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उरण शहर शाखेपासून जिल्हाप्रमुख, माजी आमदार मनोहर भोईर यांच्या नेतृत्वाखाली निघालेला मोर्चा तहसीलदार कार्यालयावर धडकला. यावेळी मनोहर भोईर यांनी सरकार आणि भाजपवर घणाघाती टीका केली. यानंतर महाआघाडीच्या वतीने तहसीलदारांना महागाई रोखण्यासाठी निवेदन दिले.
यावेळी उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, रुपेश पाटील, जिल्हा परिषद सदस्या प्रेरणा पाटील, पंचायत समितीचे उपसभापती परेश ठाकूर, सदस्या कविता पाटील, नितेश पाटील, उपजिल्हा संघटक ममता पाटील, शेकाप तालुका चिटणीस रवी घरत, उरण पंचायत समितीचे सभापती महेश म्हात्रे, माजी सभापती नरेश घरत, काका पाटील, काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष डॉ. मनीष पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोर्च्यात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
रस्त्यातच चूल मांडली
मोर्च्यादरम्यान आंदोलकांनी रस्त्यातच चूल मांडली. गणपती चौकात महिलांनी चुलीवर भाकऱ्या करून केंद्र आणि राज्य सरकारचा तीव्र निषेध केला. यावेळी कार्यकर्त्यांनी ‘या सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय’, ‘मोदी-फडणवीस हाय हाय’ च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.






























































