15 लाख कोटींचा घोटाळा, राजेश मेहताचा मोदींसोबत फोटो अन्… रोहित पवारांच्या ट्विटने खळबळ, जनतेच्या पैशांची माती झाल्याचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लाखो कोटींचा घोटाळा करून खळबळ उडवून देणाऱ्या राजेश मेहता प्रकरणावरून आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि वित्तीय संस्थांवर घणाघाती हल्ला चढवला आहे. राजेश मेहताचा हा घोटाळा जगातील सर्वात मोठा अकाउंटिंग घोटाळा असणार आहे, असा दावा करत रोहित पवारांनी केला. रोहित पवारांनी राजेश मेहताचा पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतचा फोटो ट्विट करून खळबळ उडवून दिली आहे.

रोहित पवार यांनी शुक्रवारी सकाळी एक्सवर एक पोस्ट शेअर केली. यामध्ये त्यांनी अत्यंत गंभीर सवाल उपस्थित केले आहेत. मेहताच्या कंपनीत बाजारातील इतर मोठ्या म्युच्युअल फंड कंपन्या गुंतवणूक करण्यास स्पष्टपणे टाळाटाळ करत होत्या. असे असतानाही देशातील सर्वात मोठी आणि विश्वासार्ह विमा कंपनी असलेल्या एलआयसीने यात गुंतवणूक केलीच कशी? असा सवाल त्यांनी केला.

हे संपूर्ण प्रकरण देशाच्या आर्थिक सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय गंभीर असल्याचे सांगत रोहित पवारांनी सेबी सारख्या सर्वोच्च नियामक संस्थेच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अशा बड्या घोटाळ्यांकडे दुर्लक्ष करून सेबीसारख्या संस्था नेमकी कशी माती खातात, हेच या प्रकरणातून सिद्ध झाले आहे, अशा कडक शब्दांत त्यांनी वित्तीय यंत्रणांना धारेवर धरले.

सर्वात मोठे दुर्दैव म्हणजे एलआयसीमध्ये गुंतलेला पैसा हा देशातील कोट्यवधी सर्वसामान्य जनतेचा, कष्टकऱ्यांचा आहे. या घोटाळ्यामुळे जनतेच्या हक्काच्या पैशांची देखील माती झाली आहे, असेही रोहित पवार म्हणाले. आपल्या पोस्टसोबत रोहित पवारांनी एक जुना फोटो देखील जोडला आहे. ज्यामध्ये राजेश मेहता हा थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत उभा असलेला दिसत आहे. यावरून राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.

नेमके प्रकरण काय?

सोने निर्यात व्यवसायातील दिग्गज कंपनी राजेश एक्स्पोर्ट्सने पाच वर्षांत तब्बल 15 लाख कोटींचे बनावट उत्पन्न दाखवले आहे. हा घपला समोर येताच सेबीने तत्काळ कारवाई करत राजेश एक्स्पोर्ट्स व कंपनीचे मालक राजेश मेहता यांना शेअर बाजारात व्यवहार करण्यास बंदी घातली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. या कंपनीत असलेली एलआयसीची 300 कोटींची गुंतवणूक बुडण्याचा धोका निर्माण झाला आहे, तर छोट्या गुंतवणूकदारांची झोप उडाली आहे.

‘राजेश एक्स्पोर्ट्स’चा 15 लाख कोटींचा बोगस बिझनेस; कॉर्पोरेटमधील सर्वात मोठा घोटाळा, एलआयसीचे 300 कोटी बुडण्याचा धोका