‘राजेश एक्स्पोर्ट्स’चा 15 लाख कोटींचा बोगस बिझनेस; कॉर्पोरेटमधील सर्वात मोठा घोटाळा, एलआयसीचे 300 कोटी बुडण्याचा धोका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी कॉर्पोरेट जगतातील सर्वात मोठा घोटाळा सेबीच्या प्राथमिक चौकशीत समोर आला आहे. सोने निर्यात व्यवसायातील दिग्गज कंपनी राजेश एक्स्पोर्ट्सने पाच वर्षांत तब्बल 15 लाख कोटींचे बनावट उत्पन्न दाखवले आहे. हा घपला समोर येताच सेबीने तत्काळ कारवाई करत राजेश एक्स्पोर्ट्स व कंपनीचे मालक राजेश मेहता यांना शेअर बाजारात व्यवहार करण्यास बंदी घातली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. या कंपनीत असलेली एलआयसीची 300 कोटींची गुंतवणूक बुडण्याचा धोका निर्माण झाला आहे, तर छोट्या गुंतवणूकदारांची झोप उडाली आहे.

बंगळुरू येथे मुख्यालय असलेली राजेश एक्स्पोर्ट्स ही कंपनी सोने शुद्धीकरण आणि निर्यातीच्या व्यवसायात आहे. स्वीत्झर्लंडमधील ग्लोबल गोल्ड रिफायनरीज आणि वलकॅम्बी या राजेश एक्स्पोर्ट्सच्या उपकंपन्या आहेत. आर्थिक वर्ष 2021 ते 2025 या पाच वर्षांत कंपनीला सुमारे 15 लाख कोटींचे उत्पन्न झाले आहे. यातील 99.80 टक्के उत्पन्न ग्लोबल गोल्ड रिफायनरीजकडून आल्याचे दाखवण्यात आले आहे. मात्र हे आकडे फुगवून सांगण्यात आल्याचे सेबीचे म्हणणे आहे.

कागदपत्रे देण्यास टाळाटाळ केली आणि अडकले!

एका गुंतवणूकदाराने 2024 मध्ये केलेल्या तक्रारीच्या आधारे सेबीने यासंदर्भात चौकशी सुरू केली. चौकशी करताना कंपनीच्या अधिकाऱयांनी फॉरेन्सिक ऑडिटरला काही रेकॉर्ड्स देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे उत्पन्नाच्या आकडेवारीची सत्यता तपासता आली नाही. त्यातून हेराफेरीचा संशय बळावला. अखेर सेबीने गंभीर अनियमिततेचा ठपका ठेवत कंपनीवर निर्बंध लादण्याचा अंतरिम आदेश जारी केला.

शेअर बाजारात पडसाद

राजेश एक्स्पोर्ट्सवरील निर्बंधांचे शेअर बाजारात तत्काळ पडसाद उमटले. कंपनीच्या शेअरला पाच टक्क्यांचे लोअर सर्किट लागले. त्यामुळे गुंतवणूकदार धास्तावले आहेत. या कंपनीत सर्वसामान्यांचे 20 टक्के, तर एलआयसीचे 10.8 टक्के शेअर्स आहेत. एलआयसीमध्ये पॉलिसीच्या रूपाने सर्वसामान्यांचा पैसा असल्याने अंतिमतः त्यांना याचा फटका बसणार आहे.

कंपनीने फेटाळले आरोप

आर्थिक घोटाळय़ाच्या चर्चेवर राजेश एक्स्पोर्ट्सने प्रतिक्रिया दिली आहे. ‘कंपनीमध्ये कुठलीही आर्थिक अनियमितता झालेली नाही. रेकॉर्ड्समध्ये दाखवलेले उत्पन्नाचे सर्व आकडे खरे आहेत. एकही आकडा फुगवलेला नाही. आमचे कर्मचारी आणि सेबीच्या अधिकाऱयांमधील संवादाच्या अभावामुळे हा गोंधळ उडाला आहे, असे कंपनीने बीएसईला कळवले आहे.

एलआयसीची गुंतवणूक कोणाच्या इशाऱयावर? काँग्रेसचा सवाल

‘एलआयसी व अन्य सरकारी बँकांची या कंपनीत मोठी गुंतवणूक आहे. या कंपनीत अफरातफर सुरू असल्याचा सुगावा एलआयसीला कसा लागला नाही? एलआयसीने सत्ताधाऱ्यांच्या सांगण्यावरूनच या कंपनीत गुंतवणूक केली नव्हती ना,’ असा संशय काँग्रेसचे प्रवत्ते जयराम रमेश यांनी व्यक्त केला.