
हिंदुस्थानची स्टार बॅडमिंटनपटू आणि दोन वेळची ऑलिम्पिक पदकविजेती पी.व्ही. सिंधू हिचा इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील प्रवास उप उपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आला. दक्षिण कोरियाच्या अव्वल मानांकित आणि विद्यमान ऑलिम्पिक विजेत्या एन से यंग हिने सिंधूचा सरळ गेममध्ये 21-17, 21-14 असा पराभव करत पुढील फेरी गाठली. विशेष म्हणजे, सलग दुसऱ्या आठवडय़ात सिंधूला एन से यंगसमोर शरणागती पत्करावी लागली.
जकार्ता येथे झालेल्या या लढतीत सिंधूने काही क्षण दमदार खेळाचे दर्शन घडवले. मात्र महत्त्वाच्या टप्प्यांवर सातत्य राखण्यात ती अपयशी ठरली. दुसरीकडे एन से यंगने अनुभव, अचूकता आणि नियंत्रण यांचा सुरेख मेळ साधत सामन्यावर पकड कायम ठेवली. परिणामी तिने 21-17, 21-14 अशा फरकाने विजय मिळवला.
सलग दुसऱ्या स्पर्धेत एन से यंगकडून धक्का!
गत आठवडय़ात झालेल्या सिंगापूर ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीतही सिंधूला एन से यंगकडून पराभव स्वीकारावा लागला होता.


























































