
ज्येष्ठ चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांचे वयाच्या 76 व्या वर्षी मुंबईत निधन झाले. ते गेल्या काही काळापासून आजारी होते आणि त्यांच्यावर यकृताशी संबंधित आजारांवर उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाने बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली असून अनेक कलाकारांनी आणि चित्रपटसृष्टीतील दिग्गजांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
Filmmaker and director Pahlaj Nihalani passes away pic.twitter.com/ia5mOc9tD2
\— IANS (@ians\_india) June 4, 2026
पहलाज निहलानी हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अत्यंत प्रभावशाली आणि प्रसिद्ध नाव होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट बॉलिवूड चित्रपटांची निर्मिती केली. ‘शोला और शबनम’ (1992), ‘आंखें’ (1993), ‘अंदाज’, ‘तलाश’, ‘जुली 2’ आणि ‘रंगीला राजा’ यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांची त्यांनी निर्मिती केली.
बॉलिवूडचा सुपरस्टार गोविंदा याला चित्रपटसृष्टीत पहिला मोठा ब्रेक देण्याचे श्रेय पहलाज निहलानी यांना जाते. त्यांनी 1986 मध्ये आलेल्या ‘इल्झाम’ या चित्रपटातून गोविंदाला लॉंच केले होते आणि त्यानंतरही त्यांनी गोविंदासोबत अनेक यशस्वी चित्रपट केले.
चित्रपट निर्मितीशिवाय त्यांनी चित्रपटसृष्टीतील विविध संघटनांमध्ये महत्त्वाची पदे भूषवली. असोसिएशन ऑफ पिक्चर्स अँड टीव्ही प्रोग्राम प्रोड्युसर्स या संघटनेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी जवळपास तीन दशके काम पाहिले. 2015 ते 2017 या काळात त्यांनी सेंन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळला.
सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष असताना त्यांचा कार्यकाळ कमालीचा चर्चेत आणि वादग्रस्त राहिला. चित्रपटांमधील दृश्यांवर आणि संवादांवर कात्री चालवण्याच्या त्यांच्या कडक धोरणामुळे आणि घेतलेल्या काही धाडसी निर्णयामांमुळे ते सतत प्रसारमाध्यमांच्या आणि हेडलाईन्सच्या केंद्रस्थानी राहिले होते.

























































