
देशात ‘न खाने दूंगा’च्या डरकाळ्या फोडणाऱ्यांच्याच दिव्याखाली अंधार आहे. त्यामुळेच कुठे अनधिकृत इमारती कोसळत आहेत, कुठे हॉटेल-रेस्टॉरंटस्ना तर कुठे इस्पितळांना आगी लागत आहेत. ‘शॉर्ट सर्किट’ हे नेहमीचे कारण देत अशा दुर्घटनांच्या जबाबदारीतून मालक-चालक आणि सत्ताधारी जबाबदारी झटकून बाजूला होत आहेत. आता सरकार तोंडदेखली कारवाई करून कुणाला तरी बळीचा बकरा बनवेल. ‘देश बदल रहा है’च्या वल्गना करणाऱ्यांच्या राज्यात काहीच बदललेले नाही. भ्रष्ट आणि गलथान कारभार सुरूच आहे आणि त्याच्या वणव्यात सर्वसामान्यांचे जीव कापरासारखे जळून खाक होत आहेत. दिल्लीतील हॉटेल आणि बिहारमधील इस्पितळातील अग्नितांडवाने हेच जळजळीत सत्य पुन्हा चव्हाट्यावर आणले आहे.
देश महागाईच्या वणव्यात होरपळत असताना अग्नितांडवाच्या घटनांनी माणसांचे बळी गेले आहेत. राजधानी दिल्ली, बिहारमधील अग्नितांडवाने घेतलेले बळी धक्कादायक आहेत. दिल्लीतील मालवीय नगर येथील हॉटेल ‘फ्लरिश स्टे’मध्ये लागलेल्या आगीने 21 जणांचा बळी घेतला, तर बिहारमधील मुजफ्फरपूर येथील प्रसाद हॉस्पिटलच्या आयसीयू विभागातील आगीत दहा रुग्णांचा जीव गेला. दोन्ही दुर्घटनांसाठी आता नेहमीची तांत्रिक कारणे सांगितली जात आहेत. मात्र या सर्व तांत्रिक कारणांना शेवटी त्या-त्या ठिकाणची प्रशासकीय बेपर्वाई आणि भ्रष्ट कारभार जबाबदार आहे, त्याचे काय? दिल्लीच्या हॉटेलमधील आगीत जीव गमावणारे रुग्णांचे नातलग होते, तर मुजफ्फरपूरच्या इस्पितळातील दुर्घटनेत रुग्णच बळी पडले. आपल्या देशात हॉटेल-रेस्टॉरंट किंवा इस्पितळांना आगी लागण्याच्या दुर्घटना वारंवार घडत असतात. त्यासाठी कधी गॅस सिलिंडरचे स्फोट, तर कधी शॉर्ट सर्किट अशी कारणे दिली जातात. दुर्घटना किंवा अपघात अचानक होतात, हे खरे असले तरी दिल्ली आणि बिहारमधील दुर्घटनांची कारणे आणि स्वरूप पाहता त्याची जबाबदारी राज्यकर्ते आणि प्रशासकीय यंत्रणांना टाळता येणार नाही. या दोन्ही दुर्घटनांनंतर चव्हाट्यावर येणारे खुलासे दिल्ली आणि बिहारमधील भाजप सरकारच्या बेपर्वा, ढिसाळ कारभारालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणारे आहेत. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता काय किंवा बिहारचे उपमुख्यमंत्री विजय कुमार चौधरी काय, दोघांनी
नेहमीप्रमाणे सखोल चौकशी
करण्याचे आदेश दिले आहेत. दुर्घटनेसाठी दोषी असणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईच्या डरकाळ्या फोडल्या आहेत. दिल्लीच्या गृहमंत्र्यांनी तर ‘बेड अॅण्ड ब्रेकफास्ट’ (बी अॅण्ड बी) योजनेतील मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्या दिल्लीतील सर्व बीएनबींना सील करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याने आता काय साध्य होणार? हकनाक गेलेले जीव परत येणार आहेत का? आधी ‘बीएनबी’ योजनेतील भ्रष्ट कारभाराचे लोणी खायचे आणि एखादी दुर्घटना घडली की, अटकासटका करायच्या, चौकशीचे नाटक करायचे आणि प्रकरणे शांत झाली की, पुन्हा सामान्य जनतेला मरण्यासाठी वाऱ्यावर सोडायचे. दिल्लीतील ‘फ्लरिश स्टे’ हे ‘बीएनबी’ योजनेंतर्गत चालवले जात होते. या योजनेत नोंदणीकृत आस्थापनांना जास्तीत जास्त आठ खोल्या आणि 16 बेडस्चीच परवानगी असते. मात्र या निकषांना धाब्यावर बसवून राजधानीत हॉटेल-रेस्टॉरंट चालविले जात आहेत. ‘फ्लरिश स्टे’ हॉटेलच्या मालकाला तर फक्त सहा खोल्यांचाच परवाना होता. तरीही तो 25 खोल्या चालवत होता. आज खडबडून जागे झालेले दिल्लीचे भाजप सरकार आधी कुंभकर्णी झोपेत नसते तर निदान त्या हॉटेलच्या आगीत होरपळून मरण पावलेल्यांची संख्या कमी झाली असती. मुख्यमंत्री रेखा गुप्ता या म्हणे या दुर्घटनेने व्यथित झाल्या आहेत आणि परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवणार आहेत. तुम्हाला
व्यथित व्हायचेच असेल
तर दुर्घटनेपेक्षा 21 जीव घेणाऱ्या तुमच्या गलथान कारभाराबद्दल व्हा. बारीक लक्ष आधी ठेवले असते तर सहा खोल्यांचा परवाना असताना हॉटेल मालकाने 25 खोल्यांचा व्यवसाय केलाच नसता. चार दिवसांपूर्वीच दक्षिण दिल्लीतील इमारत कोसळून जे सहा जण मरण पावले त्यांचे जीव वाचले असते. त्यातील दोन विद्यार्थ्यांचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न इमारतीच्या ढिगाऱ्याखाली कायमचे गाडले गेले नसते. कोसळलेल्या इमारतीच्या मालकाने भाड्यापोटी दरमहा मिळणाऱ्या दहा लाख रुपयांत आणखी भर पडावी म्हणून आणखी दोन अनधिकृत मजले बांधण्याचा प्रयत्न केला नसता. देशात ‘न खाने दूंगा’च्या डरकाळ्या फोडणाऱ्यांच्याच दिव्याखाली अंधार आहे. त्यामुळेच कुठे अनधिकृत इमारती कोसळत आहेत, कुठे हॉटेल-रेस्टॉरंटस्ना तर कुठे इस्पितळांना आगी लागत आहेत. ‘शॉर्ट सर्किट’ हे नेहमीचे कारण देत अशा दुर्घटनांच्या जबाबदारीतून मालक-चालक आणि सत्ताधारी जबाबदारी झटकून बाजूला होत आहेत. आता सरकार तोंडदेखली कारवाई करून कुणाला तरी बळीचा बकरा बनवेल. नियमित देखभाल आणि दुरुस्तीमध्ये झालेली अक्षम्य बेपर्वाई दडपून टाकेल. दुर्घटनांमध्ये मरण पावलेल्यांच्या वारसांना नुकसान भरपाईची ‘फुंकर’ घालेल आणि राज्यकर्ते नामानिराळे होतील. ‘देश बदल रहा है’च्या वल्गना करणाऱ्यांच्या राज्यात काहीच बदललेले नाही. भ्रष्ट आणि गलथान कारभार सुरूच आहे आणि त्याच्या वणव्यात सर्वसामान्यांचे जीव कापरासारखे जळून खाक होत आहेत. दिल्लीतील हॉटेल आणि बिहारमधील इस्पितळातील अग्नितांडवाने आणि त्यातील 31 बळींनी हेच जळजळीत सत्य पुन्हा चव्हाट्यावर आणले आहे.































































