
नातवाने आजीची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह आंबेनळी घाटातील खोल दरीत फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुनंदा पाटील (85) असे दुर्दैवी वृद्धेचे नाव असून हत्या करणाऱ्या आदर्श शेडगे (32) या नातवाला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, दागिन्यांच्या हव्यासापोटी हे कृत्य केल्याचा संशय असून पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.
आदर्श शेडगे हा अलिबाग तालुक्यातील पीनविरा या गावात राहतो. तर सुनंदा पाटील या सारलगाव येथे रहात होत्या. पोलादपूर तालुक्याच्या हद्दीत असलेल्या खोल दरीमध्ये एका वृद्ध महिलेचा मृतदेह आढळल्याची खबर पोलिसांना लागली होती. अलिबाग पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला.
पोलिसांनी कसून चौकशी केली असता नातू आदर्श शेडगे यानेच सुनंदा पाटील यांची हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी निर्दयी नातवाने आपल्या आजीचा मृतदेह आंबेनळी घाटातील वावलीटोक ते दावलीटोक दरम्यानच्या खोल दरीमध्ये फेकून दिला होता. या प्रकरणाचा तपास अलिबागचे पोलीस करीत आहेत.

























































