फुटबॉलच्या महायुद्धात हिंदुस्थानी वंशाची फौज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फुटबॉल विश्वचषकात हिंदुस्थानचा तिरंगा अद्याप फडकलेला नसला तरी हिंदुस्थानी वंशाच्या चार खेळाडूंनी जगातील सर्वात मोठय़ा फुटबॉल महायुद्धात आपला ठसा उमटवण्याची तयारी केली आहे. अमेरिका येथे 11 जूनपासून सुरू होणाऱ्या विश्वचषकात न्यूझीलंडचा सरप्रीत सिंग, काँगोचा सॅम्युअल मौतौसामी, ऑस्ट्रेलियाचा निशान वेलुपिल्ले आणि कतारचा तहसीन मोहम्मद जमशेद हे चार योद्धे आपल्या संघांसाठी मैदान गाजवणार आहेत.

2006 मध्ये फ्रान्सकडून विश्वचषक खेळणाऱ्या हिंदुस्थानी वंशाच्या विकास धोरासू यांच्यानंतर या चार खेळाडूंवर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. हिंदुस्थानला विश्वचषकात प्रवेश मिळाला नसला तरी हिंदुस्थानी रक्ताच्या या चौकडीने फिफा वर्ल्ड कपमध्ये दमदार हजेरी लावली आहे.

पंजाबी कुटुंबात जन्मलेला न्यूझीलंडचा मिडफिल्डर सरप्रीत सिंग हा या चौकडीतील सर्वात चर्चेचा चेहरा ठरला आहे. बायर्न म्युनिकच्या जर्सीत बुंडेस लिगा खेळणारा तो हिंदुस्थानी वंशाचा पहिलाच फुटबॉलपटू ठरला. दुखापतीतून सावरत त्याने पुन्हा संघात स्थान मिळवले असून विश्वचषकात तो न्यूझीलंडच्या हल्ल्याचे प्रमुख शस्त्र असेल.

काँगोचा अनुभवी मिडफिल्डर सॅम्युअल मौतौसामी याच्या नसानसांतही हिंदुस्थानी वारसा आहे. तमीळ वडिलांचा मुलगा असलेला मौतौसामी 57 आंतरराष्ट्रीय सामने खेळून काँगोच्या मधल्या फळीचा आधारस्तंभ बनला आहे. युरोपियन क्लब फुटबॉलचा मोठा अनुभव त्याच्या पाठीशी आहे.

ऑस्ट्रेलियाचा वेगवान विंगर निशान वेलुपिल्ले हा सध्या प्रतिस्पर्ध्यांच्या बचावफळींसाठी डोकेदुखी ठरत आहे. ऑस्ट्रेलियाकडून पदार्पणाच्या सामन्यातच गोल झळकावणाऱ्या निशानने विश्वचषक पात्रता फेरीत सातत्याने गोल करत आपली दावेदारी सिद्ध केली आहे. आता विश्वचषकात त्याच्या वेगाचा आणि आक्रमकतेचा कस लागणार आहे.

कतारचा युवा विंगर तहसीन मोहम्मद जमशेद हा या चौकडीतील सर्वात तरुण चेहरा आहे. कन्नूरमधून कतारमध्ये स्थायिक झालेल्या कुटुंबातील तहसीनने एस्पायर अकादमीत घडत कतारच्या राष्ट्रीय संघापर्यंत मजल मारली. अद्याप आंतरराष्ट्रीय गोलचे खाते उघडायचे असले तरी त्याच्या वेगवान खेळाने आणि तांत्रिक कौशल्याने त्याला विश्वचषक संघात स्थान मिळवून दिले आहे.

हिंदुस्थानचा संघ विश्वचषकात नसला तरी हिंदुस्थानी वंशाच्या या चौघांमुळे कोटय़वधी हिंदुस्थानी फुटबॉलप्रेमींना यंदाच्या स्पर्धेत आपलेपणाचा धागा सापडणार आहे. आता या चौकडीपैकी कोणता खेळाडू जागतिक स्तरावर सर्वाधिक चमक दाखवतो, याकडे अवघ्या फुटबॉल जगताचे लक्ष लागले आहे.