श्रेयस, आदित्य फाल्कन्सच्या विजयात चमकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भारताचा स्टार खेळाडू श्रेयस अय्यर टी20 मुंबई लीगच्या पहिल्याच सामन्यात चमकला. श्रेयस आणि आदित्य तरे यांच्या दमदार खेळाच्या जोरावर सोबो मुंबई फाल्कन्सने मुंबई साऊथ सेंट्रल मराठा रॉयल्सवर तीन विकेट्स राखून विजय मिळवला.

मराठा रॉयल्सच्या 153 धावांचा पाठलाग करताना फाल्कन्सने धडाकेबाज फलंदाजी केली. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानात उतरलेल्या श्रेयसने 24 चेंडूंमध्ये दोन चौकार आणि तेवढयाच षटकारांसह 30 धावांची खेळी करत धावांचा वेग कायम ठेवला. त्यापूर्वी आदित्यने अवघ्या 19 चेंडूंमध्ये 42 धावांची धडाकेबाज खेळी केली होती, त्याला सलामीवीर इशान मुलचंदानीने 57 धावांच्या सलामीच्या भागीदारीत 24 चेंडूंमध्ये 29 धावांचे योगदान दिले. पण श्रेयस बाद झाल्यानंतर फाल्कन्सच्या फलंदाजीत घसरण झाली. सिद्धेश लाडच्या नेतृत्वाखालील रॉयल्सने वारंवार धक्के देत केवळ 21 धावांत चार बळी घेतले आणि सामन्यात पुनरागमन केले. पण फाल्कन्सच्या गौतम वाघेलाने संयम राखत 23 चेंडूंमध्ये नाबाद 26 धावा करून फाल्कन्सला पाच चेंडू शिल्लक असताना विजय मिळवला.

तत्पूर्वी, कर्णधार सिद्धेशसोबत सलामीला आलेल्या साहिल जाधवने दुस्रया टोकाकडून नियमितपणे विकेट पडत असतानाही, झुंजार अर्धशतक झळकावून मराठा रॉयल्सचा डाव सावरला. त्याने आपल्या 30 चेंडूंतील 52 धावांच्या खेळीत पाच चौकार आणि तीन षटकार मारले. त्यानंतर अर्जुन दानीने (35) अखेरच्या क्षणी डाव सावरण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळेच रॉयल्सला 9 बाद 152 अशी धावसंख्या उभारता आली.

संक्षिप्त धावफलकः मुंबई साऊथ सेंट्रल मराठा रॉयल्स 20 षटकांत 152/9 (साहिल जाधव 52, अर्जुन दानी 35, आकाश पारकर 3/22, यश डिचोळकर 3/25) पराभूत विरुद्ध सोबो मुंबई फाल्कन्स 19.1 षटकांत 156/6 (आदित्य तारे 42, श्रेयस अय्यर 30, ईशान मुलचंदानी 29; मॅक्सवेल स्वामिनाथन 2/24).