
फरीदाबादमधील जेवर विमानतळाला जोडणाऱ्या बांधकामाधीन महामार्गावरील उड्डाणपुलाच्या बांधकामादरम्यान क्रेन कोसळली. या दुर्घटनेत तीन कामगारांचा मृत्यू झाला असून अनेक जण ढिगाऱ्याखाली दबल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.
आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, जोरदार वादळामुळे क्रेनवरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला. दुपारी 2 वाजता ही घटना घडली. जोरदार वाऱ्याच्या तडाख्यामुळे क्रेनची ब्रेकिंग सिस्टीम निकामी झाल्याचे कळते. त्यानंतर ती अनियंत्रित क्रेन दुसऱ्या क्रेनला धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की, दुसरी क्रेन जवळच्या एका कंटेनर ऑफिसवर कोसळली. हा कंटेनर एका बांधकाम कंपनीकडून तात्पुरते कार्यालय म्हणून वापरला जात होता. अपघाताच्या वेळी अनेक कर्मचारी आत होते, जे ढिगाऱ्याखाली गाडले गेले.
आतापर्यंत दोघांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे बांधकाम स्थळावरील सुरक्षा व्यवस्थेबद्दलही अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सविस्तर तपासानंतरच अपघाताचे खरे कारण उघड होईल.


























































