‘पळपुटे’ कांबळे आणि लोकशाहीचा सौदा; महाविकास आघाडीचा हल्लाबोल!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार साहेबराव कांबळे यांनी ऐनवेळी माघार घेतल्याने जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. पक्षातील वरिष्ठ नेते, घटक पक्ष आणि मतदारांना अंधारात ठेवून घेतलेल्या या निर्णयामुळे संतप्त झालेल्या महाविकास आघाडीने गुरुवारी दत्त चौकात जोरदार निदर्शने करत कांबळे यांच्यावर तसेच महायुती सरकारवर सडकून टीका केली.

कांबळे यांच्या माघारीमागे केवळ राजकीय दबाव नसून आर्थिक व्यवहार आणि सत्तेच्या दडपशाहीचा वापर झाल्याचा गंभीर आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला. “लोकशाही पद्धतीने लढली जाणारी निवडणूक सत्तेच्या जोरावर बिनविरोध करण्याचा प्रयत्न झाला असून हा लोकशाहीचा खून आहे,” असा आरोप आंदोलकांनी केला.

दत्त चौक परिसर घोषणाबाजीने दणाणून गेला. “लोकशाहीचा सौदा बंद करा”, “दडपशाहीचा निषेध असो”, “मतदारांचा विश्वासघात करणाऱ्यांचा निषेध असो”, “लोकशाहीची हत्या करणाऱ्यांचा धिक्कार असो” अशा घोषणांनी वातावरण तापले होते.

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी साहेबराव कांबळे यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मतदार आणि आघाडीच्या कार्यकर्त्यांचा विश्वास संपादन करून ऐनवेळी माघार घेणे हा राजकीय विश्वासघात असल्याचा आरोप करण्यात आला.

या आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. सचिन नाईक, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड, संपर्कप्रमुख किशोर इंगळे, संजय ठाकरे, जितेंद्र मोघे, राहुल ठाकरे, आरिज बेग, संजय वानखेडे, बबलू देशमुख, वैशाली सवई, कुणाल जानकर, शशांक केंढे, सय्यद रियाझ, कुशाल ठाकरे, रहमान शाह, शिवरामवर, जयराम मुनेश्वर, संजय महल्ले यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, गटनेते व नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी महाविकास आघाडीने केली असून “लोकशाहीशी गद्दारी करणाऱ्यांना जनता कधीही माफ करणार नाही,” असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.