Chandrapur News – अवैध वाळू उपशाविरोधात ब्रह्मपुरीत शिवसेनेचे आमरण उपोषण; महसूल प्रशासनाविरोधात संताप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी उपविभागात वाळूघाटांचा लिलाव झाल्यानंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा आणि वाहतूक सुरू असल्याने शिवसेनेकडून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) थेट महसूल अधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे. या बेकायदेशीर कृत्याकडे डोळेझाक करणाऱ्या महसूल प्रशासनाचा निषेध नोंदवण्यासाठी शिवसेनेने ब्रह्मपुरी उपविभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनामुळे स्थानिक प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

आंदोलकांनी दिलेल्या माहितीनुसार, या परिसरातून होणाऱ्या अवैध वाळू उपशामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत असून परिसरातील अनेक गावांमधील भूजल पातळी कमालीची खालावली आहे. याचा थेट फटका स्थानिक ग्रामस्थांना बसत असून त्यांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. तसेच वाळूची अवैध वाहतूक करणारे ट्रॅक्टर आणि हायवा वाहने रस्त्यावरून भरधाव वेगाने धावत असतात. या बेजबाबदार वाहनांमुळे झालेल्या भीषण अपघातांमध्ये एका निष्पाप तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे तर, एका महिलेचा हात निकामी झाल्याने ती कायमची अपंग झाली आहे. या गंभीर घटनांमुळे ग्रामीण भागातील जनतेमध्ये प्रचंड भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या सर्व प्रकाराबाबत शिवसेनेकडून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महसूल प्रशासनाला वारंवार निवेदने देण्यात आली होती. तसेच दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणीही केली गेली होती. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही ठोस पावले उचलली न गेल्याने अखेर कार्यकर्त्यांना उपोषणाचा मार्ग निवडावा लागला. अवैध वाळू उपसा व वाहतुकीवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी आग्रही मागणी आंदोलकांनी केली आहे.

तालुक्याचे जिथे जिथे अवैध रेती, मुरूम आणि माती जे उत्खनन सुरू आहे. ज्यांच्या अंतर्गत हे विभाग येतात, ते सगळे महसूल विभाग यामध्ये त्यांचे साटंलोटं आहे आणि त्याच्यामुळे त्यांची चौकशी झाली पाहिजे आणि दोषी ठरल्यास त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. रात्री-बेरात्री ट्रॅक्टर आता ही सुरू आहेत, विना नंबर प्लेटचे ट्रॅक्टर सुरू आहेत. त्याच्यामुळे ब्रह्मपुरी शहरातील जे नागरिक आहेत, त्यांना झोपण्याचा खूप त्रास येतोय. आम्ही तहसीलदार साहेबांकडे गेलो. तिथले आम्ही उपजिल्हाधिकारी मॅडमकडे पण गेलेलो होतो. पण अजूनपर्यंत आम्हाला ते न्याय मिळालेला नाही आहे, असे आंदोलकांनी सांगितले.

रेती घाटामुळे कित्येक लोकांचे अपघात झाले आहेत. पण त्याच्याकडे शासन अजिबात लक्ष करत नाही. त्यांना आश्वासन देण्यापलीकडे काहीच करत नाही आहे. २६ जानेवारीला जो मुलगा मरण पावला इथं त्याचे वडील सुद्धा आले आहेत. त्यांनाही आश्वासन दिलं होतं. ‘हो, करतो, करतो’ म्हणून. पण त्यांनाही कोणतीच मदत करण्यात आलेली नाही. नदीपात्रात वाळू उपसा खोलपर्यंत केल्याने परिसरातील बोरवेल कोरड्या पडल्या आहेत, असे आंदोलक म्हणाले.