
गर्भपात करण्यासाठी आवश्यक असलेले किट (गोळ्या) देण्यासाठी तक्रारदार महिलेकडे साडेचार हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारताना कामथे उपजिल्हा रुग्णालयातील वर्ग-1 च्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. डॉ. कांचन शिरीष मदार (वय 48, रा. चिपळूण, मूळ रा. पागमळा) असे लाच घेताना ताब्यात घेण्यात आलेल्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला गरोदर असून त्यांना गर्भपात करावयाचा होता. त्यासाठी त्यांनी, 3 जून 2026 रोजी चिपळूण तालुक्यातील कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. कांचन मदार यांची भेट घेतली होती. यावेळी डॉ. मदार यांनी गर्भपाताचे किट देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे 4 ते 5 हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदार महिलेची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी या संदर्भात तातडीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली.
तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आजच कामथे येथे पडताळणी केली असता, डॉ. कांचन मदार यांनी गर्भपाताच्या गोळ्या देण्यासाठी 4,500 रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एसीबीच्या पथकाने तातडीने रुग्णालयाच्या परिसरात सापळा रचला. डॉ. कांचन मदार यांनी तक्रारदार महिलेकडून 4,500 रुपयांची लाचेची रक्कम त्यांच्या खाजगी चारचाकी वाहनात स्वीकारली. लाचेची रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या लाचलुचपत विभागाच्या पथकाने त्यांना पंचांसमक्ष ताब्यात घेतले.
सदरची यशस्वी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरो ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनावणे आणि अपर पोलीस अधीक्षक सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी एसीबीचे पोलीस उप अधीक्षक अविनाश पाटील, पोलीस निरीक्षक सुहास रोकडे, मच्छिद्र जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक उदय चांदणे, पोलीस हवालदार संजय वाघाटे, विशाल नलावडे, दीपक आंबेकर, श्रेया विचारे, पोलीस शिपाई हेमंत पवार, राजेश गावकर, समिता क्षीरसागर आणि प्रशांत कांबळे यांच्या पथकाने केली आहे.





























































