
शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना मुखेड येथे उघडकीस आली आहे. आपल्याच विद्यालयातील लिपिकाकडे ६० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती ५० हजार रुपये स्वीकारताना मुख्याध्यापकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. राजेश गोविंदराव पडलवार (वय ५१, रा. शारदा नगर, नांदेड) असे अटक करण्यात आलेल्या मुख्याध्यापकाचे नाव आहे. याप्रकरणी बुधवारी रोजी रात्री नांदेड येथील विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणातील ३८ वर्षीय तक्रारदार हे मुखेड येथील हुतात्मा माधव विद्यालयात लिपिक म्हणून कार्यरत आहेत. आरोपी मुख्याध्यापक राजेश पडलवार याने विद्यालयाच्या शालेय खर्चाच्या नावाखाली जानेवारी २०२६ ते मे २०२६ या पाच महिन्यांचे प्रत्येकी १२ हजार रुपये याप्रमाणे ६० हजार रुपयांची मागणी केली होती. तक्रारदाराची अन्यत्र बदली करून देण्यासाठी आणि त्यांना कोणतीही प्रशासकीय नोटीस न देण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती.
तक्रारदार लिपिकाने या छळाबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर तक्रार नोंदवली. त्यानुसार ३ जून २०२६ रोजी करण्यात आलेल्या पडताळणीत, आरोपीने ६० हजार रुपयांऐवी ५० हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मुख्याध्यापक पडलवार याने तक्रारदाराला लाचेची रक्कम देण्यासाठी नांदेड शहरातील शारदा नगर येथील आपल्या राहत्या घरी बोलावले. बुधवारी संध्याकाळी शासकीय पंचांच्या उपस्थितीत ‘एसीबी’च्या पथकाने पडलवार यांच्या घराजवळ सापळा रचला. तक्रारदाराकडून ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताच पथकाने पडलवार याला रंगेहात जेरबंद केले.
अटकेनंतर आरोपीची अंगझडती घेण्यात आली. त्यात एक विवो कंपनीचा मोबाईल, सोन्याची अंगठी, पॅन कार्ड आणि ५ हजार ५०० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. त्यानंतर पथकाने त्याच्या घराचीही कसून झडती घेतली. या कारवाईमुळे नांदेडच्या शैक्षणिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
ही यशस्वी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक माधुरी यावलीकर, पोलीस उपअधीक्षक प्रशांत पवार आणि तपास अधिकारी पोलीस निरीक्षक प्रीती जाधव यांच्या पथकाने पार पाडली.






























































