
बांद्रे येथील गरीबनगरसारखीच कारवाई आज भिवंडीच्या लक्ष्मीनगरमध्ये करण्यात आली. दिवा-वसई रेल्वे मार्गालगत असलेल्या रहनाळ ग्रामपंचायतीच्या हद्दीतील २५८ बेकायदा झोपड्यांवर रेल्वे प्रशासनाचा बुलडोझर फिरला. त्यामुळे ऐन पावसाळ्याच्या तोंडावर येथील रहिवासी बेघर झाले आहेत.
पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली असून तब्बल तीस वर्षांनंतर रेल्वेच्या जागेवरील अतिक्रमण हटवण्यात आले आहे. अंगूरफाटा परिसरातील रहनाळ ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या रेल्वेच्या जागेत या झोपड्या बांधण्यात आल्या होत्या. येथील रहिवाशांना अनेकदा घरे रिकामी करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र झोपडपट्टीवासीयांनी आपली घरे सोडण्यास नकार दिला. अखेर आठ दिवसांपूर्वी रेल्वे प्रशासनाने अंतिम इशारा दिल्यानंतर आज पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या सहाय्याने तोडक कारवाई करण्यात आली.
रहिवाशांचा आरोप
लक्ष्मीनगरमधील झोपडपट्टीवासीयांना रहनाळ ग्रामपंचायतीने वीज व पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. अगदी अंगणवाडीसुद्धा तेथे बांधण्यात आली होती.
“आम्ही मोलमजुरी करून येथे गेल्या ३० वर्षांपासून राहत असून आमची एक पिढी येथे मोठी झाली आहे. अचानक रेल्वेने पावसाच्या तोंडावर बेघर केल्याने आम्ही जायचे तरी कुठे?” असा सवाल लक्ष्मी राठोड या महिलेने केला आहे.





























































