IND vs AFG ODI Series – टीम इंडियाला मोठा धक्का; विराट कोहली वनडे मालिकेतून बाहेर, रोहितबाबतही सस्पेन्स

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान आणि अफगाणिस्तान संघात 3 सामन्यांची एक दिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 13 जून रोजी धर्मशाळा येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन मैदानावर खेळला जाईल. त्यानंतर 17 तारखेला लखनौ येथील एकाना मैदानावर आणि 20 जून रोजी चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम मैदानावर दोन्ही संघ भिडतील. या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. स्नायूंना झालेल्या दुखापतीमुळे विराट कोहली अफगाणिस्तानविरुद्धच्या एक दिवसीय मालिकेतून बाहेर पडला आहे. ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेने बीसीसीआयच्या वरिष्ठ सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.

नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल 2026च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला सलग दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवून देण्यात विराट कोहलीने महत्त्वाची भूमिका बजावली होती. आयपीएलनंतर विराट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज असतानाच आता त्याला दुखापत झाल्याचे कळत आहे. त्यामुळे त्याला पुन्हा टीम इंडियाच्या जर्सीत खेळताना पाहण्यासाठी चाहत्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.

वयाच्या 37 व्या वर्षीही कमालीचा फिटनेस राखणाऱ्या विराटने आयपीएलच्या यंदाच्या हंगामात दमदार कामगिरी केली. गेल्या रविवारी अहमदाबाद येथे पार पडलेल्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सविरुद्ध त्याने मॅच-विनिंग अर्धशतकी खेळी केली. संपूर्ण स्पर्धेत त्याने 16 डावांमध्ये 56.25 च्या सरासरीने आणि 165.84 च्या स्ट्राईक रेटने तब्बल 675 धावा कुटल्या.

टी-20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर मुंबईतील बीसीसीआयच्या मुख्यालयात विराटच्या वनडे भवितव्याबाबत चर्चा रंगू लागल्या होत्या. मात्र, विराटने आपल्या बॅटनेच या चर्चांना पूर्णविराम दिला. 2025 मध्ये 13 एकदिवसीय डावांत 65.10 च्या सरासरीने 651 धावा करत तो या फॉरमॅटमध्ये जगातील अव्वल फलंदाज ठरला. यामध्ये त्याच्या 4 शतके आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याने हिंदुस्थानला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून देण्यात आणि चार वर्षांनंतर पुन्हा एकदा आयसीसी वनडे क्रमवारीत नंबर एकचे स्थान मिळवण्यात मोलाचे योगदान दिले.

रोहितबाबतही सस्पेन्स

दुसरीकडे, नियमित कर्णधार रोहित शर्मा या मालिकेसाठी पूर्णवेळ उपलब्ध असेल का याबाबतही प्रश्नचिन्ह कायम आहे. आयपीएलदरम्यान रोहितलाही स्नायूंची दुखापत झाली होती. त्यामुळे फिटनेस चाचणीनंतरच रोहित अफगाणिस्तानविरुद्ध खेळू शकेल अथवा नाही हे स्पष्ट होईल, असे मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी स्पष्ट केले आहे.

रोहित -विराटसाठी नवीन प्लॅन