
पूर्व प्रवेश अर्जाची पूर्तता न भरल्याने विद्यापीठाने अपात्र ठरविल्यामुळे मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स महाविद्यालयातील सात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष धोक्यात आले आहे. या विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय मिळवून देत त्यांचे शैक्षणिक नुकसान टाळा, अशी मागणी युवासेना सिनेट सदस्यांनी केली आहे.
मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स महाविद्यालयातील येथील पदव्युत्तर सात विद्यार्थी पहिल्या वर्षाला उत्तीर्ण झाले. सर्व विद्यार्थी पदव्युत्तर प्रथम वर्षी उत्तीर्ण झाले असून त्यांची प्रवेश प्रक्रिया नियमित वेळेत झाली होती. पूर्व प्रवेश अर्ज भरून घेणे कार्यालयीन कामकाजाचा भाग होता, परंतु महाविद्यालय अथवा विद्यापीठ प्रशासनाकडून याची पूर्तता न झाल्याने त्यांना अपात्र ठरवण्यात आले. यामुळे या सातही विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विद्यापीठाने त्यांच्या व्यवस्थापन परिषद समितीच्या बैठकीत अशा विद्यार्थ्यांसाठी दंडात्मक कारवाई करून नियमित करण्याचा ठराव मंजूर केला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी योग्य तो मार्ग काढून त्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत आणि माजी सिनेट सदस्य राजन कोळंबेकर यांनी नवनियुक्त प्राचार्या डॉ. मीनल मापुस्कर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी प्राचार्या मापुस्कर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार नाही असे आश्वासन दिले.




























































