
विधान परिषद निवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. या निवडणुकीमध्ये महायुतीत स्थानिक पातळीवर अंतर्गत कलह उफाळून आलेला असून अनेक ठिकाणी बंडाचे निशाण फडकवण्यात आले आहे. त्यामुळे हे बंडोबा थंडोबा होतात का याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच ठाणे-पालघर विधान परिषद निवडणुकीमध्ये नवीन ट्विस्ट पाहायला मिळाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजित पवार यांनी ठाणे-पालघर विधान परिषद निवडणुकीतून माघार घेतली आहे. गुरुवारी त्यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने विधान परिषद निवडणूक बिनविरोध झाली आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवाराने माघार घेतल्याने शिंदे गटाचे रवींद्र फाटक यांची बिनविरोध निवड झाली आहे. पालिका निवडणुकीचा बिनविरोध पॅटर्न विधान परिषदेत निवडणुकीतही दिसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

























































