
‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजित दिपके हे ६ जून रोजी हिंदुस्थानात येणार आहेत, अशी माहिती दीपके यांनी अमेरिकेतून फोन करून मला दिली. इथे आल्यानंतर दिल्लीतील जंतर-मंतरवरून ते आपली भूमिका मांडणार आहेत. मात्र, दिपके यांच्या पक्षाला जो पाठिंबा मिळालेला आहे, त्यामुळे भाजपला धडकी भरली आहे. त्यातच दिपके यांच्यावर देशविघातक कृत्य करत असल्याचा ‘नॅरेटिव्ह’ तयार करण्यात आला आहे. त्यामुळे सरकार दिपके यांना विमानतळावरूनही अटक करू शकते, अशी शक्यता विधिज्ञ अॅड. असीम सरोदे यांनी पत्रकार परिषदेत वर्तवली.
अॅड. सरोदे म्हणाले, ‘दिपके यांचा फोन आल्यानंतर हिंदुस्थानात परत येण्याची परिस्थिती आहे का, याचा अंदाज घेतला पाहिजे. कारण सरकार बदल्याच्या भावनेतून यंत्रणांचा वापर करून काही गोष्टी करणार. त्यामुळे त्यांनी संपूर्ण योजना तयार असेल तरच हिंदुस्थानात यावे,’ असा सल्ला त्यांना दिला. माझे म्हणणे त्यांनी मान्य केले; परंतु त्यांचे म्हणणे आहे की, ‘आता जी ३० ते ३५ लाख मुले नीट परीक्षेच्या माध्यमातून अन्यायग्रस्त झाली आहेत, सातत्याने परीक्षांमध्ये भ्रष्टाचार होत आहे, अव्यवस्थापन आहे, धोरणात्मक गाफीलता आहे. त्याबद्दल आत्ताच बोलले पाहिजे. ‘
कॉकरोच जनता पार्टी’ या पक्षाची स्थापनाच मुलांचे दुःख मांडण्यासाठी झाली आहे. त्यामुळे मला आता हिंदुस्थानात यायलाच पाहिजे,’ असे दिपके यांचे म्हणणे आहे. त्यामुळे ते हिंदुस्थानात येण्यावर ठाम आहेत. ते ६ जून रोजी सकाळी दिल्लीतील विमानतळावर येतील. त्यानंतर त्यांच्याबरोबर अनेकजण जंतर-मंतरवर जमतील व आपली भूमिका मांडतील, असेही अॅड. सरोदे यांनी सांगितले.
‘कॉकरोच जनता पार्टी’ला ऑनलाइनद्वारे मिळालेला पाठिंबा हा सरकारविरोधातील राग आहे व त्याचे दिपके यांच्या माध्यमातून एकत्रिकरण होणे, ही एक मोठी राजकीय घडामोड आहे. याकडे आपण एक सामाजिक क्रांती म्हणून बघितले पाहिजे. या आंदोलनात सोनम वांगचुक, अभिनेते प्रकाश राज सहभागी होणार आहेत. महाराष्ट्रातील माझ्यासह ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांना फोन करून निमंत्रित केले आहे. सर्व समविचारी लोकांना एकत्र करण्याचा प्रयत्न अभिजित करत असल्याचे अॅड. सरोदे यांनी सांगितले.



























































