
पुणे जिल्ह्यातील गावोगावी जाऊन सोनोग्राफीद्वारे महिलांचे गर्भलिंग निदान करणाऱ्या रॅकेटचा पुणे ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी एकाला अटक केली असून, डॉक्टरसह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या शोधार्थ पोलीस पथक रवाना केले आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पोलीस निरीक्षक नारायण देशमुख उपस्थित होते.
आण्णासाहेब गिरी (रा. केडगाव, ता. दौंड, मूळ रा. पारनेर, जि. नगर) याला २० मे रोजी अटक केली आहे. तर डॉक्टर अतुल अंकुश जाधव (रा. लोहगाव), नरेंद्र साहेबराव ठाकरे (रा. केसनंद, ता. हवेली), मंदार सुरेश माळी (रा. किकवी, ता. भोर) आणि सुंदरम कदम (रा. उरुळी कांचन, ता. हवेली) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी डॉ. सचिन विठ्ठल गुजर यांना १७ मे रोजी एकाने महिलेचे गर्भलिंग निदान करत असल्याचा व्हिडीओ पाठवला होता. या व्हिडीओच्या आधारे १९ मे यवत पोलीस ठाण्यात त्यांनी स्वतः फिर्यादी होऊन गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान आरोपी आण्णासाहेब गिरी याने नरेंद्र ठाकरे याच्याकडून सोनोग्राफी मशिन घेतल्याचे निष्पन्न झाले.
गिरी याला अटक केल्यानंतर गुन्ह्यात अतुल जाधव (रा. लोहगाव), नरेंद्र ठाकरे (रा. केसनंद, ता. हवेली), मंदार माळी (रा. किकवी, ता. भोर), सुंदरम कदम (रा. उरुळी कांचन) यांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. तसेच जप्त केलेल्या व्हिडीओंची पडताळणी केल्यानंतर आरोपी आण्णासाहेब गिरी स्वतः गर्भलिंग निदान करत असल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणात आतापर्यंत १५ साक्षीदारांचे जबाब नोंदविले आहेत.
आरोपींच्या बँक खात्यांचे व्यवहार, मोबाईल सीडीआर आणि इतर तांत्रिक पुराव्यांचे विश्लेषण सुरू आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली नारायण देशमुख यांनी केली.
जिल्ह्यातील केडगाव परिसरात गर्भलिंग निदान करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या इतर साथीदारांचा शोध सुरू असून, तांत्रिक तपासात आरोपी हा १२ ते १५ डॉक्टरांच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार तपासाला गती दिली असून, याची पाळेमुळे खोदून काढली जाणार आहेत.
– संदीपसिंह गिल्ल, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण
आरोपी गिरी १२ वी पास अन् करत होता, गर्भलिंग तपासणी
आरोपी अण्णासाहेब गिरी हा बारावी पास असून, त्याने बी फार्मसीसाठी प्रवेश घेतला होता. मात्र, ते शिक्षण त्याने पूर्ण केले नाही. त्यानंतर एका आयुर्वेदिक डॉक्टरसाठी एमआर म्हणून त्यांनी काम पाहिले. या सगळ्या अनुभवाच्या जोरावर आरोपीने महिलांची अवैधरीत्या गर्भलिंग निदानाची तपासणी सुरू केली. गिरीने आणखी दोन जिल्ह्यांत अशाच प्रकारे बेकायदेशीररीत्या गर्भलिंग निदान तपासणी केली आहे. त्या अनुषंगाने तपास केला जात आहे.
तपासणीसाठी ५० हजारांपर्यंत घेत होता रक्कम
आरोपी गिरी हा गावोगावी जाऊन महिलांची गर्भलिंग निदानची तपासणी करत होता. त्यासाठी प्रत्येकी साधारणपणे ४० ते ६० हजार तो फी घेत होता. त्यासोबतच घरची परिस्थिती उत्तम असल्यास त्याची रक्कमदेखील तो वाढवत होता असे तपासात निष्पन्न झाले आहे.
शेकडो महिलांची झाली गर्भलिंग निदान चाचणी
कायद्याने प्रतिबंध असलेल्या गर्भलिंग निदान चाचणी करत आरोपींनी पैशांसाठी हे सगळे षडयंत्र केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. मागील पाच वर्षांत शेकडो महिलांची आरोपीने तपासणी केली असून, याप्रकरणी संबंधित सर्वांकडे तपासणी केली जाणार असून, त्यांच्यावरदेखील अटकेची टांगती तलवार असल्याचे बोलले जात आहे.



























































