
एआय तंत्रज्ञानाच्या झपाट्याने वाढणाऱ्या वापरामुळे जगभरात मोठ्या प्रमाणावर डेटा सेंटर उभारली जात आहेत. मात्र या डेटा सेंटरमुळे होणारा प्रचंड पाण्याचा आणि वीजेचा वापर आता पर्यावरणतज्ज्ञांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. संयुक्त राष्ट्र विद्यापीठाच्या जल, पर्यावरण आणि आरोग्य संस्थेच्या (UNU-INWEH) नव्या अहवालानुसार, 2030 पर्यंत एआय डेटा सेंटरशी संबंधित वीज वापरामुळे होणारा पाण्याचा वापर इतका वाढू शकतो की तो उप-सहारा आफ्रिकेतील 1.3 अब्ज लोकांच्या वर्षभराच्या किमान घरगुती पाण्याच्या गरजेइतका असेल.
एआय डेटा सेंटरमध्ये हजारो कॉम्प्युटर सर्व्हर दिवस-रात्र कार्यरत असतात. या सर्व्हरना थंड ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शीतकरण यंत्रणांचा वापर केला जातो. विशेषतः उष्ण हवामान असलेल्या प्रदेशांमध्ये यासाठी लाखो लिटर पाण्याचा वापर केला जातो. त्यामुळे आधीच पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या भागांतील जलस्रोतांवर अतिरिक्त ताण निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अहवालानुसार, 2030 पर्यंत जगभरातील डेटा सेंटरचा वीज वापर 945 टेरावॅट-तास (TWh) इतका होण्याचा अंदाज आहे. हा आकडा पाकिस्तान, बांगलादेश आणि नायजेरिया या तीन देशांच्या एकत्रित वार्षिक वीज वापराच्या जवळपास तिप्पट आहे. 2025 मध्येच डेटा सेंटरने सुमारे 448 टेरावॅट-तास वीज वापरली होती. हा वीज वापर स्वतंत्र देश मानल्यास जगातील सर्वाधिक वीज वापरणाऱ्या देशांमध्ये 11 व्या क्रमांकावर असता.
अहवालात नमूद करण्यात आले आहे की, 2025 मध्ये डेटा सेंटरने वापरलेली ऊर्जा उप-सहारा आफ्रिकेतील 1.3 अब्ज लोकांच्या तब्बल 2.6 वर्षांच्या घरगुती वीज गरजा पूर्ण करण्याइतकी होती.
दरम्यान, अमेरिकेत नुकत्याच झालेल्या गॅलप सर्वेक्षणात एआय डेटा सेंटरविषयी नागरिकांमध्ये वाढती चिंता दिसून आली. सर्वेक्षणात 71 टक्के नागरिकांनी त्यांच्या परिसरात एआय डेटा सेंटर उभारण्यास विरोध दर्शविला. पर्यावरणावर होणारा परिणाम हे त्यामागील प्रमुख कारण असल्याचे समोर आले.
याशिवाय, अद्याप समकक्ष तज्ज्ञांकडून मंजुरी न मिळालेल्या एका संशोधनात एआय डेटा सेंटरच्या आणखी एका परिणामाकडे लक्ष वेधण्यात आले आहे. या संशोधनानुसार डेटा सेंटर सुरू झाल्यानंतर आसपासच्या जमिनीचे तापमान सरासरी 2 अंश सेल्सिअसने वाढते. काही ठिकाणी ही वाढ 9 अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवण्यात आली आहे.
संशोधकांच्या मते, या तापमानवाढीचा परिणाम डेटा सेंटरपासून सुमारे 9.9 किलोमीटर परिसरापर्यंत जाणवतो. त्यामुळे जगभरातील 34 कोटींहून अधिक लोक प्रभावित होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.


























































