
रुग्णालयात मृत्यूशी झुंज देणाऱ्या वृद्ध वडिलांची काळजी घेण्यासाठी आणि त्यांना धीर देण्यासाठी आलेल्या गुरुग्रामच्या अग्रवाल कुटुंबावर काळाने क्रूर घाला घातला आहे. दक्षिण दिल्लीतील मालवीय नगर भागातील एका हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत 21 जणांचा होरपळून मृत्यू झाला. काळजाचा थरकाप उडवणाऱ्या या दुर्घटनेत गुरुग्रामच्या अग्रवाल कुटुंबातील दोन पिढ्यांमधील 8 जणांचा करूण अंत झाला. यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
दिल्लीतील मालवीय नगर भागात असलेल्या हॉटेलला लागलेल्या आगीत एकूण 21 जणांना आपला जीव गमावावा लागला. यात 9 हिंदुस्थानी आणि 12 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. हॉटेल प्रशासनाचा ढिसाळ कारभार आणि सुरक्षेच्या नियमांचे झालेले तीन-तेरा या भीषण दुर्घटनेला कारणीभूत ठरल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. ‘इंडिया टूडे‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
गुरुग्रामच्या सेक्टर 46 मधील रहिवासी असलेले विवेक अग्रवाल (वय – 48) यांचे वडील राधेश्याम अग्रवाल (वय – 80) हे फुफ्फुसाच्या आजाराने त्रस्त असून त्यांच्यावर साकेत येथील मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. वडिलांना धीर देण्यासाठी विवेक अग्रवाल आपल्या संपूर्ण कुटुंबासह दिल्लीत आले होते. हॉस्पिटल जवळ पडावे आणि वडिलांची अहोरात्र सेवा करता यावी यासाठी या कुटुंबाने जवळच असलेल्या ‘फ्लरिश स्टे बी अँड बी’ या हॉटेलमध्ये रुम घेतली होती.
गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास या पाच मजली हॉटेलला अचानक आग लागली. इमारतीचा मार्ग अरुंद असल्याने आणि बाहेर पडण्यासाठी फक्त एकच मुख्य रस्ता असल्याने आग वेगाने पसरली. हॉटेलचे खिडक्या-दरवाजे कायमचे सीलबंद होते आणि मुख्य दरवाजा सेन्सरवर चालणारा असल्याने वीज पुरवठा खंडित होताच लोक आतमध्येच अडकले. अवघ्या काही मिनिटांत संपूर्ण इमारत धुराचे लोळ आणि आगीच्या ज्वाळांनी वेढली गेली.
या भीषण आगीत विवेक अग्रवाल, त्यांच्या पत्नी तर्जनी अग्रवाल, आणि दोन निष्पाप मुली जिविशा व वर्या, झवेरी, अशोक अग्रवाल, कमला आणि प्रेमलता अग्रवाल यांचा होरपळून आणि धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला. तर्जनी अग्रवाल यांच्या माहेरचे तीन नातेवाईकही राधेश्याम यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी खास दिल्लीत आले होते आणि याच हॉटेलमध्ये थांबले होते. या आगीत त्यांचाही दुर्दैवी अंत झाला. एकाच रात्रीत संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाल्याने मॅक्स हॉस्पिटलबाहेर जमलेल्या नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.



























































