
>> वैश्विक, [email protected]
गेल्याच आठवड्यात ‘सुंदर’ दिसणाऱ्या ‘शुक्र’ ग्रहाचं कौतुक केलं ते त्याच्या दिसण्याविषयीचं. प्रत्यक्षात या ग्रहाचं ‘असणं’ त्याच्या जवळून ‘दर्शना’त काही सुखावह मोहक वाटत नाही. सूर्यमालेतल्या या एकमेव उलट गतीने फिरणाऱ्या ग्रहाची वैशिष्टय़े अनेक. त्याचा दिवस त्याच्या एका वर्षापेक्षा मोठा! या त्याच्या गुण किंवा दोषवैशिष्ट्यांना तो काहीच करू शकत नाही. त्याचं नैसर्गिक स्वरूपच विचित्र वाटावं असं आहे.
मुळात शुक्र एवढा तेजस्वी का दिसतो? त्याचं कारण त्याचं ढगाळ वातावरण. हे ढग साधेसुधे नाहीत. पृथ्वीवरच्या ढगांसारखे ‘जलद’ किंवा पाणी देणारे तर अजिबात नाहीत. कार्बन आणि सल्फर यांची प्रचंड वाफ या उष्ण ग्रहाच्या भोवती कोंडलेली आहे. त्यामुळे शुक्राचा पृष्ठभाग (मंगळाप्रमाणे) दुर्बिणीतूनसुद्धा स्पष्ट दिसणं दुरापास्त होतं. त्याच्या पृष्ठभागावरच्या या ढगांच्या आवरणामुळे सूर्यप्रकाश मात्र मोठ्या प्रमाणावर परावर्तीत होतो. हे ढग खूप दाट आहेत.
सुमारे 6000 किलोमीटरची सल्फर-कार्बन मेघमाला शुक्र ग्रहाभोवती घोंगावत असते. सल्फरच्या वाफेचे हे ढग स्वयंपाकघरातल्या ओट्याच्या ‘सिंक’मध्ये जोरात नळ सोडला तर पाणी बाहेर उडते तसे वाफेचे ‘फुत्कार’ टाकत असतात. या बाष्प उत्सर्जनाचं प्रमाण शुक्रपृष्ठाबाहेरच्या वातावरणात (किंवा भागात) 50 किलोमीटरपर्यंत पसरतं, त्याला ‘हायड्रोलिक जम्प’ असं म्हणतात.
2016 मध्ये जपानच्या ‘जॅक्सा’ म्हणजे जॅपनीज एअरोस्पेस एक्प्लोरेशन एजन्सी या आपल्या ‘इस्रो’सारख्या अवकाश अभ्यास संस्थेने शुक्राच्या अभ्यासासाठी ‘अकात्सुकी’ यान पाठवलं. शुक्र ग्रहाच्या वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी ते निघालं 20 मे 2010 या दिवशी. म्हणजे 16 वर्षांपूर्वी. परंतु ठरल्या कार्यक्रमानुसार त्याला डिसेंबरमध्ये शुक्राच्या वातावरणाशी जवळीक साधताच आली नाही.
त्यामुळे शुक्राला फेरी मारून निसटलेलं ‘अकात्सुकी’ अगांतुकासारखं पाच वर्षे सूर्याभोवतीच फिरत राहिलं. त्याच्या मूळ उद्दिष्टानुसार त्याने पुन्हा शुक्राजवळ जाऊन त्यावरील कार्बन-सल्फरच्या मेघमालेचं परीक्षण करावं यासाठी पृथ्वीवरचे स्पेस-टेक्नॉलॉजिस्ट अथक प्रयत्न करू लागले. अखेरीस त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन हे भलतीकडेच भरकटलेलं यान 2015 च्या डिसेंबरमध्ये एकदाचं योग्य ‘मार्गी’ लागलं. मग मात्र शुक्राभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत परिक्रमा करताना त्याने शुक्राच्या वातावरणाची नोंद बारकाईने आणि तपशीलवार घेतली.
‘अकात्सुकी’वर जडवलेले विविधलक्ष्यी कॅमेरे मग भराभर कार्यरत झाले (किंवा करण्यात आले). वेगवेगळ्या ‘वेव्हलेंथ’च्या (तरंगलांबीच्या) कॅमेऱ्यांनी शुक्राच्या वातावरणाचे थर योग्य प्रकारे मोजले. त्याच्या गुरुत्वाकर्षणाचा अचूक प्रभाव नोंदला. तिथले वातावरण म्हणजेच कार्बन-सल्फरचे ढग असल्याने त्यांच्यातील थरांचं ‘डॉयनॅमिक्स’ किंवा परस्परसंबंध कसे घडतात हे जाणून घेत ‘अकात्सुकी’ने त्यातील ग्रॅव्हिटी वेव्ह (ग्रॅव्हिटेशनल नव्हे) समजून घेतली.
आधी असं ठरलं होतं की, या यानाने शुक्राजवळ आणि दूर अशा 300 ते 80 हजार किलोमीटरच्या लंबवर्तुळाकार फेऱ्यांमधून शुक्रपृष्ठाचे निरीक्षण करावे. प्रत्यक्षात 1000 ते 10 हजार किलोमीटर जवळून शुक्र ग्रह न्याहाळणं त्याला जमलं. शुक्र ग्रहाच्या ढगांचा खगोलभौतिकी अभ्यास (क्लाऊड-फिजिक्स) करून गेल्या वर्षीच्या सप्टेंबरमध्ये ‘अकात्सुकी’ने आपलं कार्य संपवलं.
इफ्रारेड, युव्ही (अल्ट्राव्हायोलेट) आणि डिजिटल फोटो घेणाऱ्या नेहमीच्या अशा तीन प्रकारे शुक्राचं ‘फोटोसेशन’ झालं. त्यातून या ग्रहाच्या गुंतागुंतीच्या हवामानाचा अंदाज संशोधकांना आला. यामध्ये शुक्रावरच्या मेघमालेत विद्युततांडवही होतं आणि सध्या शुक्रावरील ज्वालामुखी जागृत झालेत का याचा आढावा घेण्यात आला.
‘अकात्सुकी’वर ‘लायटनिंग ऍण्ड एअरग्लो’ कॅमेरा (एलएसी) बसवला होता. त्याद्वारे विजांचे फोटो घेतले गेले. ‘अल्ट्राव्हायोलेट इमेजर’ने शुक्राच्या वातावरणातील विविध प्रकारच्या ‘वायूं’ची नोंद घेतली.
लॉन्गवेव्ह इफ्रारेड कॅमेऱ्याने (एलआयआर) शुक्राच्या वातावरणाच्या वरच्या थरातील ढगांच्या उष्णता उत्सर्जनाच्या तरंगलांबीचा वेध घेतला.
‘इफ्रारेड’ प्रकारचे 1 आणि 2 असे कॅमेरे या यानावर होते. यापैकी आयआर-1 ने शुक्र ग्रहाच्या रात्रीच्या भागातील प्रारणं टिपली, तर आयआर-2 ने दिवसाच्या भागातील प्रारणांची नोंद केली. त्याने खोल वातावरणातील ‘थर्मर एमिशन’ किंवा उष्णोत्सर्जनाचं मोजमाप केलं.
या यानाचे नाव ‘ठेवण्यासाठी’ जनतेला आवाहन केले गेले होते. 2,60,214 लोकांनी त्यात भाग घेतला. ती नावं प्लेटवर कोरून यानाला जोडण्यात आली. ‘अकात्सुकी’च्या काहीशा लांबलेल्या आणि मधली पाच वर्षे अक्षरशः ‘अधांतरी’ झालेल्या ‘मिशन’ला अखेर यश आलं व दुर्बिणीतून सुंदर दिसणारा शुक्र मोहक नव्हे तर ‘दाहक’ असल्याचं वैज्ञानिक सत्य उलगडलं. अर्थात कवीकल्पनेतील रोमॅन्टिक शुक्र कायम विलोभनीयच असणार!






























































