एल निनोमुळे मॉन्सून मंदावला, पाऊस लांबण्याची चिन्हे; शास्त्रज्ञांनी व्यक्त केली चिंता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंद महासागरातील हवामानविषयक हालचाली सध्या नेहमीपेक्षा कमकुवत झाल्याने यंदाच्या मान्सूनबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. हवामानतज्ज्ञांच्या मते, एल निनोची स्थिती विकसित होत असल्याने पावसाचे प्रमाण कमी होण्याची आणि मान्सूनच्या प्रगतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

सामान्यतः हिंद महासागरातील उबदार पाणी ढगांची निर्मिती आणि कमी दाबाच्या क्षेत्रांना चालना देते. यामुळे निर्माण होणाऱ्या हवामान प्रणाली हिंदुस्थानकडे सरकून मान्सूनला बळकटी देतात. मात्र सध्या महासागरात ढगांची निर्मिती आणि हवामानविषयक हालचाली नेहमीपेक्षा कमी असल्याचे शास्त्रज्ञांनी नमूद केले आहे.

उपग्रह छायाचित्रांमध्ये हिंदुस्थानच्या दक्षिणेकडील महासागर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात निरभ्र आकाश दिसत आहे. त्यामुळे पाऊस निर्माण करणाऱ्या प्रणाली कमी प्रमाणात तयार होत आहेत. परिणामी मान्सूनच्या वाऱ्यांना अपेक्षित बळ मिळत नसून केरळसह देशातील अनेक भागांमध्ये पावसाचा वेग मंदावला आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या हवामानविषयक संस्थेने, म्हणजेच World Meteorological Organization (WMO), उष्णकटिबंधीय प्रशांत महासागरातील समुद्रपृष्ठावरील असामान्य तापमानामुळे एल निनोची परिस्थिती निर्माण होत असल्याचे म्हटले आहे. यामुळे जगभरातील पर्जन्यमान आणि तापमानाच्या पद्धतींवर परिणाम होऊ शकतो तसेच येत्या काही महिन्यांत अतिवृष्टी, उष्णतेच्या लाटा आणि इतर तीव्र हवामान घटनांचा धोका वाढू शकतो, असा इशारा दिला आहे.

WMO च्या अहवालानुसार, जून ते ऑगस्ट 2026 या कालावधीत अनेक प्रदेशांमध्ये सरासरीपेक्षा अधिक तापमान राहण्याची शक्यता आहे.

WMO च्या ताज्या अंदाजानुसार, जून ते ऑगस्ट 2026 दरम्यान एल निनो विकसित होण्याची शक्यता सुमारे 80 टक्के आहे. नोव्हेंबरपर्यंत ही स्थिती कायम राहण्याची शक्यता 90 टक्क्यांहून अधिक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. एल निनोचा प्रभाव मध्यम ते तीव्र स्वरूपाचा असू शकतो, मात्र त्याची नेमकी तीव्रता आणि कालावधी याबाबत अद्याप निश्चितता नसल्याचे संस्थेने स्पष्ट म्हटले आहे.