प्रज्ञानंदची ऐतिहासिक कामगिरी; विश्वविजेत्या कार्लसनला एकाच स्पर्धेत दोनदा धूळ चारत आनंदच्या 19 वर्षे जुन्या विक्रमाशी बरोबरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानचा युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने बुद्धिबळ जगतात पुन्हा एकदा खळबळ माजवली आहे. नॉर्वे चेस स्पर्धेच्या आठव्या फेरीत त्याने विश्वविजेता मॅग्नस कार्लसनचा पराभव करत एका खास क्लबमध्ये स्थान मिळवले आहे. एकाच प्रतिष्ठित स्पर्धेत कार्लसनला दोनदा पराभूत करण्याचा पराक्रम प्रज्ञानंदने केला असून हिंदुस्थानचा दिग्गज खेळाडू विश्वनाथन आनंद यांच्या 19 वर्षे जुन्या ऐतिहासिक विक्रमाची बरोबरी केली.

27 मे रोजी झालेल्या तिसऱ्या फेरीत प्रज्ञानंदने पांढऱ्या मोहोऱ्यांनी खेळताना कार्लसनला नमवले होते. त्यानंतर बुधवारी झालेल्या आठव्या फेरीत त्याने काळ्या मोहोऱ्यांनी खेळताना पुन्हा एकदा कार्लसनवर मात करत त्याला दुहेरी धक्का दिला. विशेष म्हणजे, गेल्या 2024 मध्ये झालेल्या नॉर्वे चेस स्पर्धेतही प्रज्ञानंदने कार्लसनला पराभूत केले होते.

दरम्यान, क्लासिक चेसच्या इतिहासात गेल्या 19 वर्षांत एकाच स्पर्धेत कार्लसनला दोनदा पराभूत करणारा प्रज्ञानंद हा पहिलाच खेळाडू ठरला आहे. यापूर्वी 2007 मध्ये हिंदुस्थानचे दिग्गज बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांनी लिनारेस आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत कार्लसनला एकाच स्पर्धेत दोनदा पराभूत केले होते.

ऐतिहासिक विजय मिळवूनही 20 वर्षीय प्रज्ञानंदचे पाय जमिनीवर आहेत. मॅग्नस कार्लसनला हरवण्यापेक्षा या टप्प्यावर स्पर्धेत सामना जिंकणे माझ्यासाठी अधिक महत्त्वाचे होते. त्यामुळे मला हा विजय मिळवता आला, याचा आनंद आहे, असे ‘चेसबेस इंडिया’शी बोलताना प्रज्ञानंद म्हणाला.

कार्लसन खूप चांगला खेळला आणि त्याने अप्रतिम बचाव केला. इतर कोणताही खेळाडू असता तर अशा दबावाच्या परिस्थितीत लहान-सहान पोझिशनल चुका केल्या असत्या, पण कार्लसन अगदी शेवटपर्यंत योग्य चाली शोधत राहिला. एका क्षणाला मला वाटले की हा सामना ड्रॉ होईल, पण इतका चांगला बचाव केल्यानंतरही अचानक त्याच्याकडून झालेली चूक माझ्यासाठी पथ्यावर पडली, असेही तो म्हणाला.

दरम्यान, स्पर्धेत आता केवळ दोन फेऱ्या शिल्लक असून प्रज्ञानंद 12 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. वेस्ली सोवि 14 गुणांसह अव्वल, तर अलीरेजा फिरोजा 13 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. पुढील फेरीत प्रज्ञानंदचा सामना हिंदुस्थानच्याच विद्यमान जागतिक विजेता डी. गुकेशशी होईल, तर अंतिम फेरीत तो जर्मनीच्या व्हिन्सेंट कीमरचा सामना करेल.