राहुरी परिसरात रात्री घिरट्या घालणारे तीन ड्रोन जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रात्रीच्या वेळी आकाशात घिरट्या घालणारे तीन संशयित ड्रोन तालुक्यातील राहुरी फॅक्टरी, बेलापूर आणि सोनगाव परिसरातून ताब्यात घेतले आहेत.

जिल्हा पोलीसप्रमुख मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस व पुणे येथील विशेष अँटी-ड्रोन पथकाने सुरू केलेल्या शोधमोहिमेला अखेर यश आले आहे. गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील अनेक भागांत रात्री आकाशात घिरट्या घालणाऱ्या ड्रोनमुळे भीतीचे व संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. या ड्रोनचा संबंध अनेकांनी चोरीच्या टोळ्यांशी, तर काहींनी परराज्यातील गुन्हेगारांच्या हालचालींशी जोडून संशय व्यक्त केला होता.

सोमवारी (दि. २) रात्री ‘मिशन अँटी ड्रोन’अंतर्गत राहुरी पोलीस व पुणे येथील विशेष अँटी-ड्रोन पथकाने अत्याधुनिक अँटी ड्रोन गन, लेझर गन आणि तांत्रिक उपकरणांच्या साहाय्याने आकाशातील संशयास्पद हालचालींवर बारीक लक्ष ठेवले. ड्रोनची दिशा, उंची, वेग आणि उड्डाणमार्गाचा मागोवा घेत त्यांचा स्रोत शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. या वेळी राहुरी फॅक्टरी, बेलापूर आणि सोनगाव परिसरातून तब्बल तीन संशयित ड्रोन निदर्शनास आले. ड्रोनचे गूढ अजून पूर्णपणे उलगडलेले नसले, तरी तीन संशयित ड्रोन पोलिसांच्या हाती लागल्याने तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली आहे. आता ड्रोनमागील सत्य काय आहे, याकडे संपूर्ण तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

या मोहिमेत पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, हवालदार सूरज गायकवाड, प्रमोद ढाकणे, जालिंदर पाखरे यांच्यासह पुणे अँटी ड्रोन पथकातील हेडकॉन्स्टेबल संदीप जगताप, सोहेल सय्यद आणि रियाज शेख यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. जप्त केलेल्या तीनही ड्रोनची तांत्रिक तपासणी केली जाणार असून, त्यांचा मालक, उड्डाणाचा उद्देश आणि संभाव्य नेटवर्क याचा सखोल तपास करणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी दिली.