
नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाने धडक मोहीम उघडली आहे. 25 मे ते 31 मे या सहा दिवसात एफडीएने राज्यभरात जोरदार कारवाई करत नियम धाब्यावर बसविणाऱ्या 203 आस्थापनांवर कारवाई केली. यावेळी 102 जणांना अटक करून 86 आस्थापना सील केल्या.
तुकाराम मुंढे यांनी एफडीए आयुक्तपदाचा कार्यभार सांभाळल्या पासून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांविरोधात जोरदार मोर्चा खोवला आहे. नियम पायदळी तुडवत मनमानीपणा करणाऱ्या व्यावसायिकांना दणका देण्यास एफडीएने सुरूवात केली आहे. 25 ते 31 हे या सहा दिवसांच्या कालावधीत एफडीएने राज्यातील विविध ठिकाणच्या 203 आस्थापनांवर छापेमारी केली. यावेळी दोषी आढळणाऱ्या विरोधात गुन्हे दाखल करून 102 जणांना अटक केली. शिवाय 86 आस्थापनांना सील ठोकले. या संपूर्ण कालावधीत एक कोटी 58 लाख 28 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्रतिबंधित पानमसाला, गुटखा तसेच दुग्ध व दुग्धजन्य पदार्थ आंबे व आईस्क्रीम आदी खाद्यपदार्थांवर कारवाई करण्यात आली.
दरम्यान, या कारवाया यापुढेही सुरुच राहणार, भेसळ किंवा अनधिकृत कारभार करून जनतेच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचे निदर्शनास येताच तत्काळ आमच्याकडे तक्रार करा असे आवाहन एफडीएकडून करण्यात आले आहे.


























































