
मालाड, मालवणीतील 14 प्राथमिक शाळांना अनधिकृत ठरत त्या बंद करण्याची नोटीस महापालिकेने धाडली आहे. त्याविरोधात जनहित याचिका दाखल झाली आहे. त्याची दखल घेत न्यायालयाने राज्य शासनासह पालिकेकडून याचे उत्तर मागितले आहे.
नाझिर खान यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. या शाळा इंग्रजी माध्यमाच्या आहेत. येथे हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांची योग्य ती पर्यायी व्यवस्था न करता, या शाळांनी नोंदणीसाठी अर्ज केले आहेत की नाही याची शहानिशा न करताच पालिकेने या शाळा बंद करण्याची नोटीस धाडली. मालवणी पोलिसांत या शाळांविरोधात गुन्हा नोंदवला. ही सर्व कारवाई रद्द करावी, अशी प्रमुख मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
शिक्षण मंत्रालय, पालिकेचा शिक्षण विभाग यांना या याचिकेत प्रतिवादी करण्यात आले आहे. मुख्य न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी व न्या. अद्वैत सेठना यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली.
मुंबईतील 164 शाळांना नोटीस
मुंबईतील तब्बल 164 शाळा विनापरवाना व योग्य त्या पायाभूत नसतानाही सुरू असल्याचा ठपका ठेवत पालिकेने त्यांना नोटीस जारी केली आहे. मुळात मालवणीतील बंद असलेल्या शाळांनादेखील पालिकेने नोटीस धाडली आहे. या शाळेत गरीब कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मालवणी परिसरात असलेल्या पालिकेच्या शाळेत या विद्यार्थ्यांचे समायोजन करता येणार नाही. शाळा बंद झाल्यास या विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गदा येईल, असे या याचिकेत नमूद करण्यात आले आहे.




























































