
हिंदुस्थानी खेळाडूंनी नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेच्या सातव्या फेरीत शानदार पुनरागमन केले. आर. प्रज्ञानंदने फ्रान्सच्या अलीरेजा फिरोजाचा पराभव करत महत्त्वाचे तीन गुण मिळवले, तर विद्यमान जगज्जेता डी. गुकेशने अमेरिकेच्या वेस्ली सोविरुद्ध टायब्रेकमध्ये विजय मिळवला, तर दिव्या देशमुख यांनी जेतेपदाच्या शर्यतीतील आपली आशा कायम राखली आहे.
पांढऱया मोहऱयांनी खेळणाऱया प्रज्ञानंदने 26 व्या चालीनंतर सामन्यावर पकड मजबूत केली आणि अलीरेजा फिरोजाला सलग दुसऱया क्लासिकल सामन्यात पराभूत केले. अमेरिकेच्या वेस्ली सोविरुद्धच्या क्लासिकल सामन्यात गुकेश विजयाच्या उंबरठय़ावर पोहोचला होता, मात्र सामना बरोबरीत सुटला. त्यानंतर झालेल्या टायब्रेकमध्ये गुकेशने बाजी मारली. महिला गटात दिव्या देशमुखने आपलीच देशसहकारी अनुभवी ग्रॅण्डमास्टर कोनेरू हम्पीचा आर्मागेडन टायब्रेकमध्ये पराभव करत 10 गुणांची कमाई केली.

























































