उद्या माटुंग्यात ‘मास्तरांची सावली’ 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने मराठी साहित्यातील कामगार कवी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नारायण सुर्वे यांच्या साहित्यसंपदेवर आधारित ‘मास्तरांची सावली’ हा कार्यक्रम शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता दादर-माटुंगा कल्चरल सेंटर येथे आयोजित करण्यात आला आहे.

नारायण सुर्वे यांच्या कविता, लेखन आणि गाण्यांमधून उभे राहिलेले सामाजिक वास्तव, मानवी मूल्ये आणि संघर्षमय जीवनप्रवास यांचा वेध या कार्यक्रमातून घेण्यात येणार आहे. साहित्य, संगीत आणि अभिवाचन यांचा सुंदर संगम असलेला हा कार्यक्रम रसिकांसाठी एक वेगळी अनुभूती ठरणार आहे. ज्येष्ठ कवी-अभिनेते सौमित्र ऊर्फ किशोर कदम, अभिनेत्री नंदिता पाटकर, साहित्यिक डॉ. मुकुंद कुळे, अभिनेते हर्षल पाटील आणि कवी अक्षय शिंपी हे कलाकार नारायण सुर्वे यांच्या साहित्याचा विविध अंगांनी परिचय करून देणार आहेत. या कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशीष शेलार यांचे मार्गदर्शन लाभले आहे. रसिकांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.