
करवीर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाकडून अवैधरीत्या देशी-विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांकडून ४ लाख ५९ हजार रुपयांची दारू तसेच टेम्पो व चारचाकी अशा दोन वाहनांसह एकूण १३ लाख ६९ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिली.
जिल्हा पोलीसप्रमुख नीलोत्पल यांनी अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. या सूचनांनुसार करवीर ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाने कळंबा गावच्या हद्दीत सापळा रचून ही कारवाई केली.
एका चारचाकी गाडीतून ३१ हजार ७०० रुपये किमतीची विदेशी दारू व चारचाकी गाडी, असा एकूण ७ लाख ३१ हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. संशयित आरोपी शहाजी साताप्पा बरगे (वय ४८, रा. अर्जुनवाड, ता. राधानगरी) याच्याकडून हा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कोल्हापूर ते राधानगरी मार्गावरून जाणाऱ्या एका टेम्पोच्या तपासणीत संशयित आरोपी मुबीन अजीज शेख (वय २६, रा. शिवाजीनगर, पुलाची शिरोली, ता. हातकणंगले. सध्या रा. बुध्याळकरनगर, कळंबा, ता. करवीर) याच्याकडून ४ लाख २७ हजार ८७५ रुपये किमतीच्या देशी-विदेशी दारूसह वाहन, असा एकूण ६ लाख ३७ हजार ८७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पकडलेला माल हा ‘गोल्डन वाईन्स’ (हॉकी स्टेडियम जवळ) व ‘मेरवाडे वाईन्स’ (सायबर चौक, कोल्हापूर) या ठिकाणांहून घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे संबंधित वाईन्स मालकांनादेखील या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे.
पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) नाथा गळवे, सुभाष सरवडेकर, रणजित पाटील, विजय तळसकर, विजय पाटील, योगेश शिंदे, प्रकाश कांबळे, अमोल चव्हाण, सोमराज पाटील आणि श्रीधर जाधव यांनी ही कारवाई केली.

























































