
उद्योगपती अनिल अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपचे माजी वरिष्ठ अधिकारी अमिताभ झुनझुनवाला यांना कथित बँक कर्ज प्रकरणात अटक करण्यात आली आहे. मुंबईतील विशेष सत्र न्यायालयाने त्यांना 5 जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाने रिलायन्स कम्युनिकेशन्स आणि अनिल अंबानी यांच्या विरोधात बँकेला 2 हजार 929.05 कोटींचे नुकसान पोहोचवल्याच्या आरोपाखाली हा गुन्हा नोंदवण्यात आला. एसबीआयच्या नेतृत्वाखालील 11 बँकांच्या एका संघाने रिलायन्स कम्युनिकेशन्सला ‘रुपया मुदत कर्ज’ मंजूर केले होते. एफआयआरनुसार एकूण कर्जाची रक्कम 19, 694 कोटी रुपये होती आणि त्यात 17 सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा समावेश होता. तपास यंत्रणेच्या माहितीनुसार, रिलायन्स एडीएजी फर्मचे झुनझुनवाला हे कंपनीच्या कॉर्पोरेट फायनान्स, बँकिंग आणि निधीचा वापर यासह कामकाजाच्या प्रमुख बाबींवर नियंत्रण ठेवत होते. कर्जाच्या निधीचा वापर त्याच्या सूचनेनुसार करण्यात आल्याचा आरोप सीबीआयने केला आहे. या प्रकरणात 16 जणांविरुद्ध पहिले आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात झुनझुनवाला यांना विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश जे. पी. दरेकर यांच्यासमोर हजर करण्यात आले. विशेष सरकारी वकील ए. लिमोसिन आणि जितेंद्र शर्मा यांच्यामार्फत सीबीआयने सखोल तपासासाठी त्यांच्या कोठडीची मागणी केली तेव्हा न्यायालयाने 5 जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली.


























































