
छत्रपती संभाजीनगरमधील सोयगाव तालुक्यातील नायगाव जलविद्युत प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी मराठवाड्याची ग्रीन वॉल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजिंठा डोंगराच्या जवळपास 750 एकर वनजमीनीवरील झाडांची कत्तल करण्यात येणार आहे. याचा विरोध करत शिवसेना नेते, आमदार अंबादास दानवे यांनी हा प्रकल्प तत्काळ रद्द करावा अशी मागणी पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
वृक्षतोड फाईल्स : सोयगाव व्हर्जन
’रयतेच्या भाजीच्या देठाला हात लावू नये..’ हे वाक्य मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी काल उच्चारले; पण ते झाडांच्या सामूहिक कत्तलीचा पुरस्कार करणाऱ्या व्यक्तीच्या मुखी शोभत नाही. छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव रेंजमध्ये कल्पनेपेक्षा मोठी वृक्षतोड प्रस्तावित आहे, तीही वनविभागाचा, ग्रामपंचायतीचा अहवाल विरोधात असताना!
झाड अभयारण्यातील असो किंवा अन्य वनक्षेत्रातील, ऑक्सिजन देण्यात ते कधीही भेदभाव करत नाही, मग तोडताना तुम्ही का फरक करता?
हा फडतूसपणा सहन केला जाणार नाही! आता बस्स. हा प्रकल्प रद्द करा.
— Ambadas Danve (@iambadasdanve) November 2, 2026
या पत्राची प्रत त्यांनी सोशल मीडियावर शेअर करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी ”वनविभागाचा, ग्रामपंचायतीचा अहवाल विरोधात असताना छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव रेंजमध्ये कल्पनेपेक्षा मोठी वृक्षतोड प्रस्तावित आहे. आम्ही हा फडतूसपणा सहन करणार नाही. हा प्रकल्प तत्काळ रद्द करा”, असा इशारा अंबादास दानवे यांनी दिला आहे.

































































