
आखातामध्ये पुन्हा एकदा युद्धाचा भडका उडाला असून इराण आणि अमेरिकेतील संघर्ष टोकाला पोहोचला आहे. अमेरिकन सैन्याने बुधवारी पहाटे होर्मुझच्या सामुद्रधुनीतील केशम बेटावर मोठे हल्ले केले. या हल्ल्यामुळे इराणची चांगलीच सटकली असून इराणने बहरीन आणि कुवेतमधील अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे हल्ला केला. केशम बेटांवर केलेल्या हल्ल्यांचा बदला घेण्यासाठी हा हल्ला करण्यात आल्याचे इराणच्या सशस्त्र दलाने जाहीर केले. या हल्ल्यानंतर संपूर्ण आखाती देशांमध्ये युद्धाचे ढग गडद झाले असून प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. ‘इंडिया टूडे‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
इराणच्या सैन्याने कुवेत आणि बहरीन येथील अमेरिकेच्या पाचव्या नौदल ताफ्याला आणि एका मुख्य एअर बेसला लक्ष्य केले. अमेरिकेने आमच्या एका तेलवाहू जहाजावर आणि टेलिकम्युनिकेशन अँटेनावर हल्ला केला होता. आमच्याविरोधात आक्रमकता दाखवली तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी चेतावणी आम्ही दिली होती. आज रात्री आम्ही आमचा तो शब्द पाळला आहे, असे इराणच्या सैन्याने म्हटले. इराणची सरकारी वृत्तवाहिनी आयआरआयबीने याबाबत वृत्त दिले आहे.
क्षेपणास्त्र-ड्रोन हवेतच नष्ट
इराणच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यानंतर कुवेतमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास प्रचंड स्फोटांचा आवाज ऐकू आला. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. इराणने डागलेले ड्रोन आणि क्षेत्रणास्त्र हवेतच नष्ट करण्यात आल्याचे कुवेतच्या सैन्याने स्पष्ट केले आहे. हवेत नष्ट झालेल्या क्षेपणास्त्रांचे अवशेष किंवा ढिगारा रस्त्यावर किंवा कुठेही पडलेला दिसल्यास त्याला हात लावू नका, कारण ते घातक ठरू शकते. अशा वस्तू दिसल्यास ताबडतोब 112 या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधा, असे आवाहन कुवेत सैन्याचे प्रवक्ते कर्नल सौद अब्दुलअजीज अल-ओतैबी यांनी केले आहे. तसेच अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत सरकारी माहितीवरच विसंबून राहावे असेही त्यांनी म्हटले.

बहरीनमध्ये वाजले सायरन
बहरीनमध्येही परिस्थिती गंभीर बनली आहे. बहरीनच्या गृह मंत्रालयाने बुधवारी तात्काळ धोक्याचे सायरन वाजवून नागरिकांना सतर्क केले. नागरिकांना शांत राहण्याचे आणि जवळच्या सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दुसरीकडे इराणच्या वृत्तवाहिनीने सोशल मीडियावर काही व्हिडिओ शेअर केले आहेत. यात इराणची क्षेपणास्त्रे बहरीनच्या आकाशातून जाताना दिसत असल्याचा दावा केला जात आहे.
केशम बेटांवरील हल्ल्याने युद्ध भडकले
शस्त्रसंधी असतानाही अमेरिकेने 2 जून रोजी इराणच्या केशम बेटांवर हवाई हल्ले केले. इराण या बेटावरून अमेरिकन आणि मित्रराष्ट्रांवर ड्रोन हल्ले करण्यासाठी ‘ग्राउंड कंट्रोल स्टेशन’ चालवत होते आणि ते आम्ही उद्ध्वस्त केले, असे अमेरिकेने म्हटले. या कारवाईपूर्वी इराणने मध्यपूर्वेत डागलेली अनेक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन अमेरिकेने हवेतच पाडले होते.
Following the hostile actions of the U.S. in the Persian Gulf, the Strait of Hormuz, and Qeshm Island, American bases in Kuwait were hit. pic.twitter.com/iVGC0P1r3p
— IRIB (Islamic Republic of Iran Broadcasting) (@iribnews_irib) June 2, 2026






























































