
नेपाळने हिंदुस्थानची जमीन बळकावल्याचा गौप्यस्फोट करणारे नेपाळचे पंतप्रधान बालेन शहा यांना ब्रिटनने दणका दिला आहे. हिंदुस्थानसोबत असलेल्या सीमावादात ब्रिटनने मध्यस्थी करून मदत करण्याची बालेन शहा यांनी केलेली मागणी ब्रिटनने फेटाळली. हा मुद्दा द्विपक्षीय असून त्यात हस्तक्षेप करणार नसल्याचे ब्रिटनने स्पष्ट केले.
नेपाळने हिंदुस्थानची एकूण 7,600 एकर जमीन बळकावली आहे. याची कबुली स्वतः बालेन शहा यांनी रविवारी नेपाळच्या संसदेत दिली होती. त्यावरून खळबळ उडाली. आज त्यांनी काठमांडू येथे ब्रिटनचे नेपाळमधील राजदूत रॉब फेन यांची सल्लागार कुमार ब्यांजंकर यांच्यासोबत भेट घेतली. हिंदुस्थान आणि नेपाळची सीमा निश्चित करणाऱ्या सुगौली करारात ब्रिटन पक्षकारांपैकी एक आहे. ब्रिटनने बोलल्यास हिंदुस्थान आणि नेपाळमधील वाद सुटू शकतो. सीमावाद साडवण्यासाठी ब्रिटनने मध्यस्थी करावी, अशी मागणी त्यांनी ब्रिटिश राजदूतांकडे केली. मात्र त्यांनी नेपाळची मागणी फेटाळली. हा नेपाळ आणि हिंदुस्थानमधील द्विपक्षीय विषय आहे. ब्रिटनला त्यात हस्तक्षेप करायचा नाही, असे स्पष्ट उत्तर फेन यांनी दिले.
दोन्ही देशांमधील संबंध खूप चांगले असल्यामुळे अतिक्रमण किंवा जमीन बळकाल्याचा मुद्दा आजपर्यंत कधीच चर्चेत आला नाही, असे नेपाळचे हिंदुस्थानातील माजी राजदूत निलांबर आचार्य यांनी सांगितले. नेपाळचे माजी राजदूत दीप कुमार उपाध्याय यांनीही शहा यांचा दावा फेटाळताना म्हटले की, अतिक्रमणाचा मुद्दा कुठेही नोंदविण्यात आलेला नाही.



























































