
अमेरिकेच्या सीमा शुल्क आणि सीमा संरक्षण विभागाने ‘ऑपरेशन चेकमेट’ राबवत बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या 30 हिंदुस्थानींना अटक केली आहे. या सर्व जणांना लवकरत अमेरिकेतून हद्दपार करत मायदेशी पाठवण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत एकूण 36 ट्रक चालकांना अटक करण्यात आली आहे. यापैकी 30 हिंदुस्थानी तर अन्य मेक्सिको, अल साल्वाडोर आणि रशियातील नागरिक आहेत.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, सर्व ट्रक चालकांकडे कॅलिफोर्निया, न्यूयॉर्क, वॉशिंग्टन आणि व्हर्जिनिया यांसारख्या राज्यांचे व्यावसायिक वाहन चालक परवाने होते; तर काहींकडे कोणत्याही प्रकारचा वाहन चालक परवानाच नव्हता. बहुतेकांकडे बायडेन प्रशासनाच्या काळातील रोजगाराची अधिकृत कागदपत्रे होती. मात्र त्याची मुदत संपली आहे. ऑपरेशन चेकमेटचा मुख्य उद्देश हा स्थलांतरविषयक कायद्यांची कडक अंमलबजावणी करून सार्वजनिक सुरक्षा वाढवणे हा आहे.
डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाच्या अंतर्गत वाहतूक विभागाने परदेशी चालकांना व्यावसायिक ट्रक आणि बसचे परवाने न देण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या काही महिन्यांत अमेरिकेत हिंदुस्थानी वंशाच्या ट्रक चालकांमुळे अनेक अपघात झाले होते. त्यानंतर फेडरल एजन्सीने ही शोध मोहीम तीव्र केली.






























































