
राज्य मंडळाशी संलग्न शाळांमधील विद्यार्थ्यांना नव्या अभ्यासक्रमावर आधारित इयत्ता दुसरी, तिसरीची पाठय़पुस्तके 10 जूननंतर, तर चौथीची पुस्तके 15 जूनच्या आसपास उपलब्ध होणार आहेत. मात्र, इयत्ता सहावीच्या पुस्तकांच्या निर्मितीचे काम सुरू असल्याने, सहावीची सर्व माध्यमांची पुस्तके विद्यार्थ्यांना 25 जूनपर्यंत उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती बालभारतीच्या संचालक अनुराधा ओक यांनी बुधवारी दिली.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शालेय अभ्यासक्रमात बदल करण्यात येत आहे. त्यानुसार बालभारतीकडून इयत्तानिहाय नव्या पुस्तकांची निर्मिती करण्यात येत आहे. गेल्या वर्षी इयत्ता पहिलीची नवी पुस्तके प्रकाशित केल्यानंतर, यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीची नवी पुस्तके विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. याबाबत ओक यांनी माहिती दिली. यावेळी ‘बालभारती’चे वरिष्ठ अधिकारी योगेश लिमये, किरण पेंद्रे आदी उपस्थित होते. ओक म्हणाल्या, इयत्ता दुसरी आणि तिसरीच्या पुस्तकांच्या छपाईचे काम पूर्ण झाले असून, या पुस्तकांच्या वितरणाची प्रक्रिया सुरू आहे.
सहावीची पुस्तके उशिरा मिळणार
सहावीच्या नव्या पुस्तकांना 1 जून रोजी मान्यता मिळाली आहे. त्यामुळे या पुस्तकांच्या प्रिंटींगचे काम अजून सुरू व्हायचे आहे. अशा परिस्थितीत ही पुस्तके 25 ते 30 जून या कालावधीत राज्यातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. ही पुस्तकेविद्यार्थ्यांपर्यत कमी कालावधीत पोहोचण्यासाठी बालभारतीची यंत्रणा कार्यरत आहे. ‘एससीईआरटी’कडून सेतू अभ्यासक्रम (ब्रिज कोर्स) निर्मितीची प्रक्रिया सुरू आहे. हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिकवून पूर्ण होईपर्यत, सर्व पुस्तके विद्यार्थ्यांना मिळालेली असतील,असे ओक यांनी सांगितले.






























































