
सांगली पाटबंधारे विभागाकडून पिण्याच्या पाण्याची वाढती मागणी लक्षात घेऊन कोयना धरणातून आज (दि. ३) दुपारी अडीच वाजता विसर्ग सुरू करण्यात आला. कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे एक युनिट कार्यान्वित करून सुमारे १०५० क्युसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात आल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.
सांगली जिल्ह्यासह नदीकाठच्या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत असल्याने ही उपाययोजना करण्यात आली आहे. धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याचा विचार करून आवश्यकतेनुसार विसर्ग सुरू करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. आगामी काही दिवसांत पिण्याच्या पाण्याची गरज वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. दरम्यान, कोयना नदीपात्रातील पाण्याची पातळी अचानक वाढू शकते, त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. महसूल, आपत्ती व्यवस्थापन तसेच स्थानिक प्रशासनाला आवश्यक दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत.

























































