
मुंबईचे माजी महापौर हरेश्वर पाटील यांचे आज निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. 1999 ते 2002 या कालावधीत मुंबईचे महापौर म्हणून त्यांनी यशस्वीरीत्या काम केले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच श्रद्धांजली अर्पण करून स्थायी समितीची बैठक आज तातडीने तहकूब करण्यात आली.
हरेश्वर पाटील यांचा विभागीय स्तरावरील लोकसहभाग वाढविण्यासाठी 16 प्रभाग समित्यांची स्थापना करण्यात पुढाकार होता. महापालिकेच्या विविध विभागांचे संगणकीकरण सुरू करून त्यांनी प्रशासन अधिक पारदर्शक व कार्यक्षम करण्याचे प्रयत्न केले. महापौर असताना मुंबई महापालिका मुख्यालयातील हेरिटेज सभागृहात भीषण आग लागल्याने सभागृह आणि सभागृहातील राष्ट्रीय नेत्यांचे तैलचित्र जाळून खाक झाले होते. मात्र ते महापौर असतानाच सदर जळालेल्या सभागृहाचे युद्धपातळीवर नूतनीकरण करून त्या सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू करण्यात आले. त्यांच्याच कारकीर्दीत के/पूर्व विभागासाठी स्वतंत्र प्रशासकीय इमारत बांधणी, प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृह निर्मिती करण्यात आली. मुंबईची वाढती तहान भागविण्यासाठी त्यांनी मध्य वैतरणा या प्रस्तावित नवीन धरणाच्या कामासाठीदेखील त्यांनी त्यांच्या कार्यकाळात शासनाकडे पाठपुरावा केला होता. पालिका शाळांतील विद्यार्थ्यांसाठी संगणक प्रणाली अमलात आणणारे ते पहिले महापौर होते. त्यासाठी त्यांनी 52 माध्यमिक शाळांसाठी संगणक आणि संगणकीय शिक्षण उपलब्ध करून दिले.






























































