
रशियातील रिफायनरी उत्पादनात झालेली घट आणि ऊर्जा नेटवर्कमधील बदलती परिस्थिती लक्षात घेता राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. देशांतर्गत साठा सुरक्षित ठेवण्यासाठी रशियाने ३० नोव्हेंबरपर्यंत विमान इंधनाच्या निर्यातीवर तात्पुरती बंदी घातली आहे. सोमवारी जारी केलेल्या निवेदनात याबाबत माहिती देण्यात आली आहे. देशांतर्गत इंधन क्षेत्रातील संतुलन राखण्यासाठी हा तात्पुरता व्यापारी प्रतिबंध घालण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. टीव्ही९ भारतवर्षने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
रशियन सरकारच्या म्हणण्यानुसार, या निर्णयाचा मुख्य उद्देश देशांतर्गत इंधन बाजारपेठेत स्थिरता सुनिश्चित करणे हा आहे. मॉस्को डिझेल आणि जेट इंधनाच्या संभाव्य निर्यातीवर बंदी घालण्याचा विचार करत असल्याचे अहवाल समोर आल्यानंतर हे धोरण लागू करण्यात आले आहे.
गेल्या काही महिन्यांत युक्रेनकडून रशियाच्या ऊर्जा पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यात आले आहे. यामध्ये ऑइल प्रोसेसिंग रिफायनरी आणि इंटर-कंट्री पाईपलाईन नेटवर्कचा समावेश आहे. या हवाई हल्ल्यांमुळे रशियाच्या ऊर्जा क्षमतेवर परिणाम झाला आहे. ज्यामुळे देशांतर्गत पुरवठा सुरक्षित करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. विशेषतः अशा वेळी, जेव्हा देशामध्ये इंधनाचा हंगामी वापर वाढतो.
दरम्यान, रशिया हा पेट्रोलियम उत्पादनांचा जगातील प्रमुख निर्यातदार देश आहे. रशिया आपल्या डिझेल आणि विमान इंधनाच्या उत्पादनाचा मोठा हिस्सा आंतरराष्ट्रीय खरेदीदारांना पाठवतो. मात्र प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, नव्याने लागू करण्यात आलेल्या या निर्यात बंदीचा आधीपासून अस्तित्वात असलेल्या आंतर-सरकारी करारांतर्गत होणाऱ्या इंधन पुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही.





























































