आनंदवार्ता! मान्सून केरळममध्ये दाखल; IMD कडून ‘ऑरेंज अलर्ट’ जारी, महाराष्ट्रात पावसाच्या सरी कधी बरसणार?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी समोर आली असून नैऋत्य मान्सून केरळममध्ये दाखल झाला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजापेक्षा काहीसा उशिराने मान्सून केरळममध्ये दाखल झाला आहे. उशिर झाला असला तरी गडगडाटासह पावसाने केरळममध्ये हजेरी लावली असून हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच पुढील काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातही पावसाच्या सरी बरसतील असा अंदाजही आयएमडीने वर्तवला आहे.

नियमित वेळेपेक्षा यंदा 3 दिवस उशिराने मान्सून केरळममध्ये दाखल झाला आहे. केरळममध्ये धडकल्यानंतर मान्सून सामान्यत: टप्प्याटप्प्याने उत्तरेकडे सरकतो आणि जुलैच्या मध्यापर्यंत देशातील बहुतांश भाग व्यापतो. त्यानुसार 15 जूनच्या आसपास मान्सून विदर्भात दाखल होण्याची शक्यता आहे.

मुसळधार पावसाचा इशारा

पुढील काही दिवस केरळममध्ये अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. याशिवाय तामिळनाडू आणि कर्नाटकच्या काही भागांतही जोरदार पाऊस पडू शकतो. तसेच वायव्य, मध्य, पूर्व आणि दक्षिण हिंदुस्थानतील अनेक भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि जोरदार वाऱ्यासह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

…म्हणून मान्सून उशिराने दाखल झाला

पश्चिम पॅसिफिक महासागरात निर्माण झालेल्या एका शक्तिशाली चक्रीवादळामुळे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील आर्द्रता खेचली गेली. तसेच लक्षद्वीप जवळ निर्माण झालेल्या चक्रीवादळ परिस्थितीमुळे मॉन्सूनचा वेग मंदावला आणि केरळममधील त्याचे आगमन तीन दिवस लांबले, असे हवामान विभागाने सांगितले.