
कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांना जोडणाऱ्या रेवस-रेड्डी सागरी महामार्गाचे काम सुसाट सुरू झाले आहे. रेवदंडा खाडीपुलाच्या उभारणीला वेग आला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी एक हजार २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून हा महामार्ग तयार झाल्यानंतर रायगड जिल्ह्यातील किनारपट्टी भागातील वाहतूक अधिक जलद होणार आहे.
रेवस-रेड्डी सागरी महामार्गाचे काम अशोका बिल्डकॉन लिमिटेड ही कंपनी करत आहे. हा महामार्ग रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतून जात आहे. या महामार्गावर रेवस करंजा, रेवदंडा, बाणकोट, आगरदांडा, केळशी, कुणकेश्वर आणि जयगड खाडीवर असे सात पूल बांधले जात असून महामार्गाची लांबी सुमारे ४९८ किलोमीटर इतकी आहे. रेवस-रेड्डी सागरी महामार्ग हा कोकण किनारपट्टीच्या दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जातो. रेवदंडा खाडीवरील पूल पूर्ण झाल्यानंतर अलिबाग, रेवदंडा, मुरुड आणि परिसरातील विविध गावांमधील प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
अडीच वर्षांत काम तडीस
रेवस-रेड्डी महामार्गावर सध्या पूल उभारणीचे काम जोमाने सुरू असून, चौल, रेवदंडा परिसरात पुलाचे खांब उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. २०२८ अखेरपर्यंत पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कोकण किनारपट्टीतील संपर्क व्यवस्था अधिक मजबूत होऊन आर्थिक विकासाला गती मिळेल, असा विश्वास शासकीय पातळीवर व्यक्त केला जात आहे.





























































