हिंदुस्थानच्या हवाई हद्दीत प्रवेश नाकारला, मुंबईला येणारे स्कँडिनेव्हियन एअरलाइन्सचे विमान माघारी परतले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानच्या हवाई हद्दीत प्रवेश नाकारल्याने कोपनहेगनहून मुंबईला येणारे स्कँडिनेव्हियन एअरलाइन्सचे विमान माघारी परतले. स्कँडिनेव्हियन एअरलाइन्सने 17 वर्षांनंतर हिंदुस्थानातील विमानसेवा पुन्हा सुरू केली. मंगळवारी कोपनहेगनहून मुंबईसाठी विमान निघाले. सुमारे चार तास उड्डाण केल्यानंतर हिंदुस्थानच्या हवाई वाहतूक नियामकाने या उड्डाणासाठी मंजुरी दिली नसल्याचे विमानातील कर्मचाऱ्यांना कळविण्यात आले. त्यामुळे विमानाला अर्ध्या प्रवासातूनच परतावे लागले. कोपनहेगन विमानतळावर विमान सुरक्षितपणे उतरले.

द न्यू इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, एअरबस ए330 प्रकारचे फ्लाइट SK969 हे विमान अझरबैजानवरून उडत असताना कोपनहेगनमधील हवाई वाहतूक नियंत्रण युनिटने कॉकपिटमधील कर्मचाऱ्यांना परत फिरण्याचे निर्देश दिले. नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाला (DGCA) कोणत्याही विमान उड्डाणासाठी लेखी मंजुरी देणे आवश्यक असते. तथापि, हवाई वाहतूक क्षेत्रातील सूत्रांनुसार, ही मंजुरी देण्यात आली नव्हती. अनेक वेळा फोन आणि संदेश पाठवूनही, DGCA ने प्रतिसाद दिला नाही. हवाई वाहतूक मंत्रालयानेही यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

दरम्यान, मुंबई विमानतळावर एक टीम स्कँडिनेव्हियन एअरलाइन्सच्या या पहिल्या विमानाच्या लँडिंगची तयारी करत होती. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाचे स्वागत करण्यासाठी वॉटर कॅनन सलामी सज्ज ठेवण्यात आली होती. त्यानंतरच विमानतळ प्रशासनाला विमान उतरणार नसल्याचे कळवण्यात आले. अधिकाऱ्यांकडून अपेक्षित असलेली अंतिम मंजुरी अपेक्षेप्रमाणे न मिळाल्याने विमान कोपनहेगनला परतले, असे स्कँडिनेव्हियन एअरलाइन्सने एका निवेदनात म्हटले आहे.