
व्हीगन खाद्यपदार्थ खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आता अशी उत्पादने सहज ओळखता येणार आहेत. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (एफएसएसएआय) व्हीगन खाद्यपदार्थांसाठी प्रमाणित लोगो जाहीर केला असून, १ जुलै २०२७ पासून सर्व मान्यताप्राप्त व्हीगन उत्पादनांच्या पॅकेजिंगवर हा लोगो लावणे बंधनकारक असणार आहे.
व्हीगन आणि प्राणिजन्य घटक असलेल्या पारंपरिक खाद्यपदार्थांमध्ये ग्राहकांना फरक शोधता यावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सुधारित ‘फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स (व्हीगन फूड्स) रेग्युलेशन्स’नुसार प्रत्येक मान्यताप्राप्त व्हीगन उत्पादनावर हिरव्या रंगातील ‘व्हीगन’ लोगो दर्शवावा लागणार आहे.
या लोगोमध्ये हिरव्या चौकटीत पानासह ‘V’ हे चिन्ह असून, संबंधित उत्पादन व्हीगन मानकांनुसार प्रमाणित असल्याचे आणि त्यामध्ये कोणताही प्राणिजन्य घटक नसल्याचे दर्शविले जाईल. एफएसएसएआयने २१ मे २०२६ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेद्वारे या लोगोचा वापर आणि त्यासंबंधीचे निकष निश्चित केले आहेत. या नियमांची अंमलबजावणी १ जुलै २०२७ पासून बंधनकारक होणार आहे.
व्हीगन खाद्यपदार्थांमध्ये कोणतेही प्राणिजन्य घटक, मिश्रके किंवा प्रक्रियेदरम्यान वापरले जाणारे प्राणिजन्य सहाय्यक पदार्थ नसतात. शाकाहारी पदार्थांमध्ये दूध, दुग्धजन्य पदार्थ, तूप, पनीर किंवा मधाचा समावेश असू शकतो; मात्र व्हीगन पदार्थांमध्ये अशा सर्व प्राणिजन्य घटकांना पूर्णपणे वगळले जाते. त्याऐवजी फळे, भाज्या, धान्ये, कडधान्ये, सुकामेवा, बिया आणि वनस्पतीजन्य दुधाचे पर्याय यांचा वापर केला जातो.
“सर्व व्हीगन पदार्थ शाकाहारी असतात; मात्र सर्व शाकाहारी पदार्थ व्हीगन असतीलच असे नाही,” असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. आरोग्याबाबत जागरूक असलेल्या ग्राहकांमध्ये, प्राणी कल्याणाबाबत संवेदनशील असलेल्या व्यक्तींमध्ये तसेच पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारणाऱ्यांमध्ये व्हीगन पदार्थांची लोकप्रियता वाढत आहे.

























































