
टी-२० वर्ल्ड कप २०२६ जिंकल्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच सूर्यकुमार यादवला कर्णधारपदावरून हटवले जाईल आणि बीसीसीआयची अपेक्स कौन्सिल कर्णधारपदावर चर्चा करण्यासाठी ऑनलाईन बैठक घेणार असल्याने गुरुवारी त्याला या निर्णयाची माहिती दिली जाईल. तसेच सूर्यकुमारच्या जागी श्रेयस अय्यरला कर्णधार बनवण्यावर बैठकीत शिक्कामोर्तब केले जाईल, असा दावा एका वृत्तपत्राने सूत्रांच्या हवाल्याने केला आहे. सूर्यकुमार यादवने यंदाच्या आयपीएल मोसमात 13 इनिंग्ज मध्ये 270 धावा केल्या. तसेच वर्ल्ड कप विजयानंतर आंतरराष्ट्रीय टी-२० मधील त्याची कामगिरी सुमार राहिली आहे. यापार्श्वभूमीवर सूर्यकुमारच्या जागी दमदार कामगिरी करणाऱ्या श्रेयस अय्यरची कर्णधारपदी वर्णी लागेल अशी चर्चा आहे.
‘दैनिक जागरण’च्या सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना सूर्यकुमारच्या जागी संजू सॅमसनला टी-२० चा कर्णधार बनवायचे होते, परंतु बीसीसीआयच्या निवड समितीचे काही सदस्यही गंभीर यांच्याशी सहमत नसल्याचे समजते. संजू सॅमसनच्या कामगिरीत सातत्य राहिलेले नसल्याचे समितीतील सदस्यांचे मत होते.
सूत्रांनी दावा केला आहे की, टीम इंजियाला टी-२० वर्ल्ड कप जिंकून देण्यात सॅमसनने मोठी भूमिका बजावली असली, तरी अनेक निवडकर्त्यांनी त्याचा दीर्घकालीन कर्णधारपदाचा पर्याय म्हणून विचार केला नाही. तसेच, त्याच्यावर इतकी मोठी जबाबदारी सोपवणे हे घाईचे ठरेल अशी चर्चा आहे.
श्रेयस अय्यरने आयपीएल (IPL) २०२५ मध्ये पंजाब किंग्सचे नेतृत्व करत त्यांना अंतिम फेरीपर्यंत पोहोचवले होते, तिथे त्यांना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून पराभव पत्कारावा लागला होता. आयपीएल २०२६ मध्ये या संघाची सुरुवात तर धमाकेदार झाली होती, परंतु सलग सहा सामने गमावल्यानंतर ते प्लेऑफमध्ये पोहोचण्यात अपयशी ठरले.
अय्यरने आपल्या संघासाठी फलंदाजीत अव्वल कामगिरी केली असून, त्याने १४ सामन्यांत १६८.८१ च्या स्ट्राईक रेटने ४९८ धावा केल्या. त्याने एक शतक आणि पाच अर्धशतके झळकावली असून, तो सूर्यकुमारच्या जागी चौथ्या क्रमांकावर (नंबर ४ वर) फलंदाजीला येईल असे समजते.



























































