उत्तराखंडमधील एमबीए विद्यार्थीनी बेपत्ता प्रकरणाला वेगळे वळण; दोन जण ताब्यात, ट्रेकिंग एजन्सीही संशयाच्या भोवऱ्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तराखंडमध्ये ट्रेकिंगदरम्यान एमबीए विद्यार्थिनी बेपत्ता प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. बबिता पांडे असे बेपत्ता विद्यार्थिनीचे नाव असून, ती दोन मित्रांसह ट्रेकिंगसाठी गेले होती. यादरम्यान ती कॅम्पमधून बेपत्ता झाली. पाच दिवस उलटले तरी बबिताचा अद्याप शोध लागला नाही. याप्रकरणी बबिताच्या दोन मित्रांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. याशिवाय एका ट्रेकिंग एजन्सीची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात आली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, बबिता ही नैनिताल जिल्ह्यातील रहिवासी असून, 28 मे रोजी ती आपल्या दोन मित्रांसह रायथल गावात मुक्कामी थांबली होती. रायथलमधील सीसीटीव्हीमध्ये बबिता कैद झाली आहे. दुसऱ्या दिवशी त्यांनी रायथल येथून दयारा बुग्यालकडे आपला ट्रेक सुरू केला आणि रात्रीचा मुक्काम गोई बेस कॅम्पवर केला. मात्र, याच कॅम्पमधून बबिता बेपत्ता झाली.

गेल्या पाच दिवसांपासून लष्कर, इंडो-तिबेट सीमा पोलीस (ITBP), राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF), पोलीस दल, वन विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी बबिताचा शोध घेत आहे. ‘प्रो माउंटेन’ (Pro Mountain) या ट्रेकिंग एजन्सीने बनावट परवान्याचा वापर करून या तिघांना ट्रेकिंगसाठी पाठवले होते, असे तपासादरम्यान पोलिसांना आढळून आले. बबिता पांडे आणि तिच्या मित्रांकडे अधिकृत पर्यटन पोर्टल ‘Explore Uttarkashi’ वर कोणताही वैध डिजिटल परवाना उपलब्ध नव्हता, असे उत्तरकाशीचे जिल्हा पर्यटन अधिकारी के.के. जोशी यांनी सांगितले.

‘प्रो माउंटेन’ या एजन्सीने सरकारी महसूल नियमांचे उल्लंघन केल्याचेही तपासात निष्पन्न झाले. यानंतर सदर ट्रेकिंग एजन्सीची नोंदणी तात्काळ निलंबित करण्यात आली आहे. पोलिसांनी बबिताच्या दोन मित्रांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. हरमनपाल सिंग आणि हरमनप्रीत सिंग अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत. तसेच ट्रेकिंग एजन्सीचे गाइड्स आणि इतर अधिकाऱ्यांचीही पोलीस चौकशी करत आहेत.