
मुंबई टी-२० लीग २०२६ स्पर्धेत ईगल ठाणे स्ट्रायकर्स संघाला दुसऱ्या सामन्यात अवघ्या एका धावेने पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर संघ निराश असला तरी खेळाडूंनी दाखवलेल्या लढाऊ वृत्तीमुळे पुढील सामन्यांसाठी आत्मविश्वास वाढल्याचे मत कर्णधार शार्दूल ठाकूर याने व्यक्त केले.
आकाश टायगर्स एमडब्ल्यूएस संघाने दिलेल्या १७३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ईगल ठाणे स्ट्रायकर्सने अखेरच्या षटकापर्यंत झुंज दिली. अटीतटीच्या या लढतीत संघाला विजयाने हुलकावणी दिली. या सामन्यात साईराज पाटीलने २३ चेंडूत ३९ धावा फटकावल्या, तर सिद्धांत सिंगने १९ चेंडूत ३७ धावांची झंझावाती खेळी केली. कर्णधार शार्दूल ठाकूरनेही १५ चेंडूत २५ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. तत्पूर्वी ओंकार तरमळे याने गोलंदाजीत चमक दाखवत तीन विकेट्स घेतल्या.
हिंदुस्थानकडून २५ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळण्याचा अनुभव पाठीशी असलेल्या शार्दुल ठाकूरने सामन्यातील सकारात्मक बाबींवर प्रकाश टाकला. “निश्चितच आम्ही निराश झालो आहोत. सामना शेवटच्या चेंडूपर्यंत गेला आणि अशा क्षणी एका धावेने पराभव होणे वेदनादायक असते. मात्र प्रत्येक खेळाडूने आपले सर्वोत्तम योगदान देण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही शेवटपर्यंत सामन्यात होतो”, असे शार्दूल म्हणाला.
जोरदार पुनरागमनाचा मानस
तो पुढे म्हणाला की, “ही स्पर्धा मोठी असून एका निकालावर अडकून राहणे योग्य नाही. आमच्या संघाने अनेक सकारात्मक गोष्टी दाखवल्या. सिद्धांतची फलंदाजी, साईराजचा अष्टपैलू खेळ आणि फलंदाजांनी घेतलेली आक्रमक भूमिका यावर आम्ही पुढे काम करू शकतो. टी२० क्रिकेटमध्ये कधीकधी १-२ महत्त्वाचे क्षण संपूर्ण सामन्याचा नूर बदलतात. दुर्दैवाने आज तो क्षण आमच्या वाट्याला आला नाही.
‘आर्क्स अंधेरी’विरुद्ध सामना
दरम्यान, ईगल ठाणे स्ट्रायकर्सचा पुढील सामना आज ५ जून रोजी ‘आर्क्स अंधेरी’ विरुद्ध होणार आहे. या सामन्यात विजय मिळवून पुन्हा एकदा विजयपथावर परतण्यासाठी संघ सज्ज झाला आहे.




























































