
कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायत हद्दीतील कुरंग आदिवासी वाडीत आज थरारक आणि धक्कादायक घटना घडली. अचानक जंगलातून गोळीबार झाला आणि अंगणात खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलाच्या शरीरात चार गोळ्या घुसल्या. हेमंत सराई असे मुलाचे नाव असून तो गंभीर जखमी आहे. त्याच्यावर उल्हासनगर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. जंगलात बेकायदा शिकारीचे प्रमाण वाढले असून शिकाऱ्यांच्या बंदुकीतून या गोळ्या सुटल्या असण्याची शक्यता आहे. नेरळ पोलीस त्याबाबत तपास करत आहेत.
सकाळी ११ वाजता चिमुकल्या हेमंतला गोळी लागली. आदिवासी वस्तीत खेळत असलेल्या मुलाला गोळ्या लागल्याने रहिवाशांमध्ये घबराट पसरली. नागरिकांनी तातडीने गंभीर जखमी असलेल्या हेमंतला उल्हासनगर रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. घटनेची माहिती मिळताच नेरळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. गोळीबार किंवा शिकार अशा सर्व बाजूंनी पोलीस शोध घेत असून संबंधित व्यक्तींचा शोध घेतला जात आहे.
या गंभीर घटनेमुळे कुरंग आदिवासी वाडीत चिंतेचे वातावरण असून जखमी हेमंतला न्याय मिळावा आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. गावपाड्यांची सुरक्षितता धोक्यात आली आहे.
गोळी की छरे?
मुलाला गोळी लागली की छरे लागले याबाबत अद्याप पोलिसांनी अधिकृत माहिती दिलेली नाही. गोळीबाराचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विविध पथके स्थापन केली आहेत. जंगली प्राण्यांची शिकार करताना गोळीबार होऊन मुलगा गंभीर जखमी झाल्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे जंगल परिसरात सुरू असलेल्या शिकारीच्या प्रकारांना आळा घालण्याची मागणी केली आहे.
पाड्यांची सुरक्षितता धोक्यात
कर्जत तालुक्यातील जंगल आणि डोंगरपट्ट्यांमध्ये काही दिवसांपासून अवैध वृक्षतोड आणि शिकारीचे प्रमाण वाढले आहे. तसेच गावठी हातभट्ट्यांच्या दारूचे अड्डेही जागोजागी आहेत. शिवाय जंगल परिसरात दारू पार्ट्या, ड्रग्जची देवाणघेवाण आणि सेवन करणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. हातेखोरीमुळे या सर्व बेकायदा प्रकारांकडे पोलीस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने आदिवासी गावपाड्यांची सुरक्षितता धोक्यात आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.





























































